जामखेड नगरपरिषद क्षेत्रात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, एकाच दिवसांत पाच ते सहा जण जखमी, दोन लहान मुले गंभीर जखमी, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील तपनेश्वर व नूरानी काॅलनी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. एकाच दिवसांत या कुत्र्याने पाच ते सहा जणांवर हल्ला केला आहे. दोन लहान मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या कुत्र्यांचा नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

जामखेड शहर व परिसरात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या आहे.भटक्या जनावरांचा प्रश्न जामखेड शहरात ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर हा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. भटके कुत्रे व जनावरांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड शहरात मागील दोन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. तपनेश्वर व नुराणी काॅलनी भागात पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांना लक्ष्य करते हल्ले केले आहेत. पाच ते सहा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. नुराणी काॅलनी येथील घटनेत ओएस जबीर तांबोळी या ८ वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवला. या चिमुकल्याच्या तोंडावर कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवला. त्याच्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. त्यालाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने तपनेश्वर परिसरातील आणखी पाच ते सहा जणांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड नगरपरिषदेने पिसाळलेल्या कुत्र्याचा तसेच भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
भटके कुत्रे व भटक्या जनावरांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. भटक्या जनावरांमुळे नागरिक, वयोवृद्ध तसेच लहान मुलांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. शहरात मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला असून नगरपरिषदने यांचा तातडीने बंदोबस्त गरजेचे आहे, भटक्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे रेबीज सारख्या गंभीर आजारांची लागण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडल्यामुळे लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जर एखाद्या नागरिक अथवा बालकाचा मृत्यू झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेची असेल, नगर परिषदेने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी दिला आहे.