ब्रेकिंग: कर्जत तालुक्यात अफू शेतीचा पर्दाफाश; चापडगावातून २३८ किलो अफू जप्त

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे प्रतिबंधित अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कर्जत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २३८ किलो अफूची झाडे जप्त केली असून तब्बल ४७.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिबंधित अफू लागवडीच्या रॅकेटबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

Breaking news, Opium cultivation exposed in Karjat taluka, 238 kg of opium seized from Chapadgaon, lcb action

या कारवाईमुळे कर्जत-जामखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिबंधीत अफू लागवडीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाल्याने हे रॅकेट कोण चालवत होते याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

📌 कोण आहे आरोपी?

जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव परमेश्वर बन्सी घनवट, वय ६८ वर्षे, रा. चापडगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर असे आहे. त्याने स्वतःच्या शेतात (गट नं. १३) दोन ते तीन महिन्यांपूर्वी अफूची झाडे लावली होती. त्या झाडांना तो नियमित पाणी व खते देऊन त्याचे संवर्धन करत होता.

📌 कारवाई कशी झाली?

स्थानिक गुन्हे शाखेला परमेश्वर घनवट हा आपल्या शेतात प्रतिबंधीत अफूची लागवड करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीने कर्जत पोलिसांची टीम सोबत घेत चापडगावात छापेमारी केली. चापडगाव शिवारातील गट नं. १३ मधील शेतात तपासणी केली असता, आरोपी परमेश्वर घनवट शेतात राखण करताना आढळला. चौकशीत त्याने अफू लागवडीची कबुली दिली.

📌 किती मुद्देमाल जप्त?

शेतातून एकूण २३८.२३९ किलो ग्रॅम वजनाची प्रतिबंधीत अफूची झाडे जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची एकूण किंमत ४७,६४,१८०/- रुपये इतकी आहे.

📌 कोणता गुन्हा दाखल?

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक शामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. ९३/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा १९८५ चे कलम ८(क) व १५(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सपोनि विजय झंजाड, पोउपनि अनंत सालगुडे, समीर अभंग, दीपक घाटकर, विजय पवार, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे, संजय सानप, किरण जाधव आणि सचिन थोरात यांच्या पथकाने यशस्वी केली.

  • 📍 महत्त्वाचे मुद्दे
  • चापडगाव (ता. कर्जत) येथे अफूची बेकायदेशीर शेती
  • २३८.२३९ किलो अफूची झाडे जप्त
  • मुद्देमाल किंमत : ₹४७,६४,१८०
  • आरोपी : परमेश्वर बन्सी घनवट (वय ६८)
  • गुन्हा : NDPS Act कलम ८(क), १५(क)