ब्रेकिंग न्यूज:सहाय्यक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात, १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले, कर्जत तालुक्यात उडाली खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील ठरावाची तक्रार दाबून टाकण्यासाठी तब्बल २५ हजार रुपयांची लाच मागणारे कर्जतचे सहाय्यक निबंधक मिलिंद प्रल्हादराव राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.

Breaking News, Assistant Registrar milind raut caught red-handed accepting bribe of 10,000 by Anti-Corruption Bureau, incident causes stir in Karjat Taluka,

तक्रारदार कर्जत तालुक्यातील एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ठराव संचालक मंडळाने मंजूर केला होता. मात्र एका संचालकाने त्या ठरावावर आक्षेप घेत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार निकाली काढून ठरावाला अडथळा येऊ न देण्यासाठी कर्जतचे सहायक निबंधक मिलिंद राऊत यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी १० हजार रुपये आधीच घेतल्यानंतर उर्वरित रकमेसाठी सातत्याने तगादा लावला जात होता.

सहाय्यक निबंधकाच्या लाच मागणीच्या त्रासाने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ९ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगरच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी ( दि १०) रोजी सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सहाय्यक निबंधक मिलिंद राऊत याला रंगेहात पकडले. 

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सविता तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर हे करीत आहेत.