बाळासाहेब ठाकरेंचा मोठा नातू राजकारणात उतरणार, काकांनी संधी दिली तर पक्षासाठी काम करण्याची पुतण्याने व्यक्त केली इच्छा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाला मोठे महत्व आहे. ठाकरे कुटुंबात सध्या दोन राजकीय पक्ष सक्रीय आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना सध्या उध्दव ठाकरे हे सांभाळत आहेत, तर शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी मनसेची अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण या पक्षाची स्थापन केली आहे. उध्दव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंचे मुलेही राजकारणात सक्रीय आहेत. आता ठाकरे घराण्यातील आणखीन एक चेहरा राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. काकांच्या मदतीसाठी पुतण्या धावून यायला सज्ज झाला आहे. तशी इच्छाच पुतण्याने जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा गाजला. शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबईत पार पडले. यात उध्दव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा सामना महाराष्ट्राने पाहिला. यात कोण जिंकलं? हा निराळा मुद्दा, पण याच मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावली त्याची राज्यात चर्चा झाली. याहीपेक्षा आणखीन एका चेहऱ्याची अधिक चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरु झाली आहे. त्या चेहर्याचे नाव आहे जयदीप जयदेव ठाकरे.
- जयदीप ठाकरे हे जयदेव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वडील शिंदेंच्या गोटात तर मुलगा उध्दव ठाकरेंच्या गोटात असे चित्र समोर येताच महाराष्ट्रात जयदीप ठाकरे यांची चर्चा सुरु झाली आहे. एकिकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना एकेक सहकारी सोडून जात असतानाच ठाकरे कुटुंबातील तरूण चेहरा उध्दव काकांच्या पाठीशी ठाम उभा राहिल्याने जयदीप ठाकरे यांची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
जयदीप ठाकरे यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात म्हटले आहे की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उध्दव काकांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. मी आजपर्यंत दसरा मेळावा ऐकत होतो, यंदा मात्र शिवतीर्थावर जाऊन प्रत्यक्ष दसरा मेळावा ऐकला. उध्दव काकांनी राजकारणात संधी दिली तर नक्की जबाबदारी पार पाडेन, कुटुंब कोणाला पाठिंबा देतयं याबाबत मला बोलायचं नाही, मी मात्र उध्दव काकांच्या पाठीशी आहे.
- पुढे बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले की, मुळ शिवसेना कोणाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. शिवसेनेत दोन गट पडतील असं केव्हाचं वाटलं नव्हतं, कोरोना काळात काका स्वता: आजारी असताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं, माझं क्षेत्र वेगळं आहे, त्यामुळे मी राजकारणात लक्ष देत नव्हतो, परंतू सध्या कुटुंब अडचणीत सापडलयं, बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून जबाबदारी पार पाडतोय. उध्दवकाकांना म्हणूनच पाठिंबा देतोय, काकांनी जबाबदारी सोपवण्यात पक्षासाठी मी माझं योगदान देण्यास तयार आहे असे सांगत जयदीप ठाकरे यांनी राजकारणात एन्ट्री करण्याचे संकेत दिले.
मी ठाकरे घराण्याचा मोठा नातू आहे.माझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे, सध्याच्या परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे.मला उद्धव काका आणि बाळासाहेबांविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळे मी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला गेलो, असं जयदीप जयदेव ठाकरे यानं म्हटलं आहे.
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे दोन नातू आधीच राजकारणात सक्रीय झाले आहेत. उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे आमदार म्हणून राजकारणात सक्रीय आहेत, ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हेही पक्षात सक्रीय आहेत. ते पक्षवाढीसाठी राज्यात दौरे करताना दिसत आहेत. आता बाळासाहेब ठाकरे यांचे तिसरे नातू जयदीप ठाकरे राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. काका उध्दव ठाकरे पुतण्या जयदीप ठाकरेंना राजकारणात उतरवणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.