Petrol Diesel News : पेट्रोल – डिझेलचा मुबलक साठा; तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, दि. २६ : Petrol Diesel News : अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा (Gas) मुबलक साठा उपलब्ध असून वितरण व्यवस्था अत्यंत सुरळीत सुरू आहे. सध्या सोशल मीडिया व व्हॉट्सॲपवर इंधन तुटवड्याबाबत (Petrol Diesel Shortage) पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पॅनिक होऊन पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस अधीक्षक व पुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा असल्याचा खोटा मेसेज किंवा चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. जे लोक अशी बेकायदेशीर कृत्ये करून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करत आहेत, त्यांच्याविरुद्ध पोलीस विभागाच्या समन्वयाने थेट गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा या बैठकीत प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील इंधन साठ्याची वस्तुस्थिती अत्यंत समाधानकारक आहे. पेट्रोलची (MS) जिल्ह्याची दररोजची गरज ३०८ किलोलिटर (KL) इतकी असून, सध्या ८४६ किलोलिटर इतका मुबलक साठा उपलब्ध आहे. तसेच, डिझेलची (HSD) दररोजची गरज ६८९ किलोलिटर (KL) असताना, सध्या १४७१ किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे.
याशिवाय, प्रमुख तेल कंपन्यांकडून इंधनाचा नियमित पुरवठा विनाअडथळा सुरू असल्याने तुटवड्याची कोणतीही शक्यता नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा निर्माण झालेला नसल्यामुळे नागरिकांनी इंधनाची अनावश्यक साठेबाजी करू नये.
खोट्या अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्रोल पंपांवर रांगा लावणे टाळावे. इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याने नागरिकांनी शांतता व संयम राखून जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.