जामखेड : अरणगावमध्ये पर्यावरणाशी अनोखं नातं जोडणारा रक्षाबंधन साजरा, विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे होतेय सर्वत्र कौतुक
जामखेड टाइम्स वत्तसेवा : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अरण्येश्वर विद्यालयात ‘वृक्षाबंधन’ हा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली आणि समाजात एक सकारात्मक संदेश दिला.

राखी पौर्णिमा ही बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानली जाते. त्याच भावनेतून झाडांना ‘भावा’प्रमाणे राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या विविध शोभिवंत राख्या झाडांना बांधल्या आणि निसर्गाबद्दल आपुलकी व्यक्त केली. कार्यक्रमात महिला शिक्षिकांनी निसर्गाचे महत्त्व, झाडांचे पर्यावरणातील योगदान आणि संरक्षणाची गरज या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, हवामानाचा समतोल राखतात, तसेच अनेक नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करतात. त्यामुळे झाडांचे रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक तुळशीराम भोजने, पर्यवेक्षक घोडके साहेब तसेच उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय हरित सेना विभाग, महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, ‘वृक्षाबंधन’ उपक्रमातून सणाच्या पारंपरिक साजशृंगाराला सामाजिक भानाची जोड देण्यात आली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज अधिकच प्रकर्षाने जाणवते. झाडे आणि निसर्ग हाच आपला खरा सखा आहे, हे भावनिक आणि बौद्धिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य झाले.
वृक्ष रक्षण हेच खरे नात्याचे बंधन
रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि नात्याचा सण. परंतु या वर्षी विद्यालयाने हा सण सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून नव्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. झाडांना बहीण मानून त्यांना राखी बांधणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
रक्षाबंधन हा नात्यांचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. झाडांशी नातं जोडून त्यांचं रक्षण करण्याचा संकल्प म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची बीजं पेरण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. ‘वृक्षाबंधन’ उपक्रमातून आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ एक सण नव्या दृष्टीकोनातून साजरा केला नाही, तर सामाजिक जबाबदारीचाही आदर्श घालून दिला आहे. आजच्या काळात निसर्गरक्षण ही केवळ शासकीय जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून जे भावनिक नातं निर्माण केलं आहे, ते निश्चितच त्यांच्या वागणुकीत आणि भविष्यातील निर्णयांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल
राखी ही फक्त भावाला बांधायची गोष्ट नाही, तर झाडांनाही आपलं मानून त्यांचं रक्षण करणं ही खूप छान कल्पना वाटली. या उपक्रमामुळे झाडांचं महत्त्व नव्याने कळलं. आपण जितकं निसर्गाशी जोडले जाऊ, तितकं आपलं आयुष्य सुंदर होईल.