जामखेड शहराच्या ज्वलंत प्रश्नांवर शिवसेना शिंदे गट आक्रमक, शिंदे-पवार वादावर माने यांचे भाष्य, प्रा कैलास माने यांचे शिंदे-पवार आमदारद्वयींना महत्वाचे अवाहन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 1 नोव्हेंबर 2022 । जामखेड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक कधी जाहीर होते, यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे.नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणारे सर्वच भावी नगरसेवक शहरातील ज्वलंत प्रश्नांवर मात्र ठोस भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे.मात्र,शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रा कैलास माने यांनी शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या ज्वलंत प्रश्नांना हात घालत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.त्याचबरोबर आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांना देखील माने यांनी पत्रकार परिषदेतून महत्वाचे अवाहन केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जामखेड तालुकाप्रमुख प्रा कैलास माने यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार विरूद्ध शिंदे सुरू असलेल्या वादात माने यांनी उडी घेतली. पत्रकार परिषदेतूून त्यांनी पवार विरूद्ध शिंदे वादासह विविध विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.
माने यांनी घेतलेली भूमिका शहरातील नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करून देणारी ठरली आहे. माने यांनी पाणीयोजना, डीपी प्लॅन, शहरहद्दवाढ, बंद असलेली गुंठेवारी सह आदी विषयांना हात घातला. तसेच शिंदे विरुद्ध पवार या संघर्षांवर महत्वाचे भाष्य केले.
यावेळी बोलताना प्रा कैलास माने म्हणाले की, जामखेड तालुक्याला योगायोगाने बर्याच वर्षानंतर दुसर्यांंदा दोन आमदार लाभलेले आहेत, यापुर्वी सदाशिव लोखंडे हे भाजपचे तर रामदास फुटाणे हे काँग्रेसचे असे दोन आमदार जामखेडला लाभले होते. परंतू त्यांनी द्वेषाचे राजकारण कधीच केलं नाही.
परंतू सध्याच्या परिस्थितीमध्ये जामखेडचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून विद्यमान दोन्ही आमदारांनी विकासाचं राजकारण करावं या दृष्टीने जामखेड तालुक्यातील जनतेला या दोन्ही आमदारांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
परंतू दोन्ही आमदारांच्या आपापसातील हेवेदाव्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. जामखेड शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही आमदारांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रा कैलास माने यांनी केली.
तसेच, पुढे बोलताना माने म्हणाले की, जामखेड शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा विषय आहे, दोन्ही आमदारांनी पाणी पुरवठा योजना मंजुर केली, प्रशासकीय मान्यता मिळाली, तांत्रिक मंजुरी मिळाली अश्या घोषणा केल्या, परंतू या घोषणा हवेतच आहेत, अजूनही जामखेडच्या नव्या पाणी योजनेच्या कामाला सुरुवात झालेली नाहीये ही परिस्थिती आहे,
तर दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारा भूतवडा तलाव हा सध्या ओसांडून वाहत असताना देखील शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याकडेही प्रा कैलास माने यांनी लक्ष वेधले.
जामखेड नगरपरिषद स्थापन झाल्यापासून शहर विकास आराखडा अजूनही तयार करण्यात आलेला नाही, तसेच शहर हद्दवाढचाही प्रश्न जैसे थे आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे प्रा कैलास माने लक्ष वेधले आहे. या प्रश्नांकडे दोन्ही आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी माने यांनी केली.
माने म्हणाले की, जामखेड नगरपरिषद स्थापन होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील ज्या नगरपंचायती आणि नगरपरिषदा स्थापन झाल्या त्यापैकी बहुतांश नगरपालिकांचा डीपी प्लॅन मंजुर झालेला आहे. जामखेड नगरपरिषदेचा डीपी प्लॅन तातडीने मंजुर करावा तसेच हद्दवाढीचा प्रस्ताव रखडल्याने शहराचा विकास खुंटला आहे याकडे सुध्दा माने यांनी लक्ष वेधले.
शहरात गुंठेवारी बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत, कारण, बर्याचश्या लोकांच्या मुला मुलींचे लग्न आहेत, व्यापार उद्योगासाठी भांडवल जमा करावं लागतं, परंतू त्यांनी जे प्लाॅट विकत घेतलेले आहेत ते त्यांना विकता येत नाहीत, त्यामुळे जामखेडची बाजारपेठ थंड झाली आहे.
जामखेड शहराचा डीपी प्लॅन मंजुर न झाल्याचाही मोठा फटका शहरातील नागरिकांना बसला आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे या दोन्ही आमदारांनी तातडीने जामखेड शहरातील ज्वलंत प्रश्नांत लक्ष घालून ह्यावर मार्ग काढावा,असे अवाहन यावेळी माने यांनी केले आहे.