जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील एका सराफ व्यावसायिकाची तब्बल 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. धक्कादायक म्हणजे या फसवणूकीत बँक मॅनेजरचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बँक मॅनेजरसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी अमोल विलास चिंतामणी (वय 49, रा. कोर्ट रोड, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून आप्पासाहेब ज्ञानदेव देवकाते (रा. काटेवाडी) धम्मसागर हिरालाल समुद्र (रा. सारोळा) आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 154/202 तसेच 318(4), 316, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय ?
दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास जामखेड शहरातील सराफ व्यावसायिक अमोल विलास चिंतामणी यांच्याकडे आप्पासाहेब ज्ञानदेव देवकाते (रा. काटेवाडी) हा त्यांच्या दुकानात आला. त्याने आपला मित्र धम्मसागर हिरालाल समुद्र (रा. सारोळा) याने आयसीआयसीआय बँकेत घेतलेले गोल्ड लोन सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून चिंतामणी यांनी देवकाते यांना 13 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, संबंधित रक्कम परत न करता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकारात आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.