जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिसांनी जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील एका शेतात कारवाई करत २८ किलो वजनाची गांजाची जिवंत झाडे जप्त करण्याची कारवाई पार पाडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. जुन्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत सुमारे दोन लाख रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

जामखेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपुर्वी जामखेड शहरात संयुक्त कारवाई करत अडीच किलो गांजा जप्त केला होता. ही कारवाई गोरोबा टॉकीज परिसरातील नितिन उर्फ कव्या धनसिंग पवार व निशा नितीन पवार यांच्या राहत्या घरी करण्यात आली होती. या प्रकरणी नितीन पवारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.पोलिसांनी नितीन पवारला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गांजा कोठून आणला याबाबत पोलिसांना माहिती दिली.
आरोपी नितीन पवारने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने रत्नापुर शिवारातील एका शेतात छापेमारी केली. या ठिकाणी पोलिसांना दोन लाख रूपये किमतीची २८ किलो गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी विजय अशोक ढवळे याला ताब्यात घेतले आहे. जामखेड तालुक्यात रत्नापुर येथील शेतात गांजाची झाडे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पार पाडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक शामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशन गुरनं. ५४७/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) प्रमाणे आरोपी नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार, वय ४२ वर्षे, निशा नितीन पवार, वय ३२ वर्षे, दोन्ही रा. कुंभारगल्ली गोरोबा टॉकिन जवळ जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांचेविरुध्द दिनांक ०९/१०/२०२५ रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी रत्नापुर येथे मोठी कारवाई पार पाडली.
जामखेड शहर व तालुक्यात गांजा विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रीय आहे. या रॅकेटचा बिमोड करण्यासाठी जामखेड पोलिसांकडून धडक मोहिम राबवली जाणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.