ब्रेकिंग न्यूज: जामखेडमध्ये पोलिसांचा मोठा दणका,२ लाख ३५ हजारांचा गुटख्याचा साठा जप्त, दोघांविरोधात गुन्हे दाखल!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बीड रोड परिसरातील दोन गोळी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल २ लाख ३५ हजार ८४४ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास जामखेड पोलिसांनी बीड रोडवरील ‘जय भगवान बाबा गोळी सेंटर’ व जय भगवान गोळी सेंटर या दोन दुकानांवर छापा टाकला. यावेळी गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा मोठा साठा पोलिसांना आढळून आला. सदर मुद्देमालाचा पंचनामा करत तो जप्त करण्यात आला.
या प्रकरणी छबू विश्वनाथ तोंडे व निलेश श्रीराम कोल्हे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२३, २२३, २७२, २७४ व २७५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिस काँस्टेबल कुलदीप घोळवे यांनी फिर्याद दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली असून, पंचनामा पूर्ण झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि वर्षा जाधव करत आहेत.