जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड येथील सरकारी दवाखान्याच्या नवीन बांधकामावरील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या आरोपींकडून ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जामखेड येथील सरकारी दवाखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. येथील कामगारांचे मोबाईल चोरी जाण्याची घटना मागील महिन्यात १४ रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध आकाश राजु साबळे रा. रांजणगांव रोड, राहाता यांनी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी कारवाई करत तुषार नितीन पवार वय-२० वर्षे रा. गोरोबा टॉकिज जवळ, जामखेड व दिलीप किसन काळे वय-१८ वर्षे रा. भुतवडा रोड, जामखेड या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांकडून विविध कंपन्याचे ४५ हजार रूपये किमतीचे तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या आरोपींना गु.र.नं. ५१५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जामखेड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार, रमेश गांगडे, हृदय घोडके, बिरप्पा करमल, गणेश लबडे, फुरकान शेख, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर सह आदींचा समावेश होता.