जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हळगाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्टाता डाॅ दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात बियाणे विक्री केंद्र सुरु करण्यात आले. तसेच उद्यानविद्या विभागाने ५१२ चौरस फुटावर उभारलेल्या शेडनेटचे उद्घाटन करण्यात आले. याद्वारे शेतकऱ्यांना खात्रीशीर फळपिकांची रोपे तयार करून देण्यात येणार आहेत.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात सहयोगी अधिष्टाता डाॅ दत्तात्रय सोनवणे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, राहूरी विद्यापीठाच्या प्राप्त निधीतून हळगाव महाविद्यालयात १० एकर प्रक्षेत्र विकसित केले आहे. २०२६ च्या खरीप हंगामात मूग, उडीद या पिकांचा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासभिमुख अंतर्गत मुलभूत बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध पिकांचे पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन केलेले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय १ मे, २०२३ रोजी पासून हाळगाव ता. जामखेड, येथे कार्यरत झाले आहे. हळगाव येथे महाविद्यालय आल्यानंतर या परिसराच्या विकासाला सुरुवात झाली आहे. अजूनही बऱ्याच बाबी बाकी आहेत.महाविद्यालय प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा प्राधान्याने देण्यावर आपला भर राहिल असे सांगत परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनपर घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची डाॅ सोनवणे यांनी माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्राध्यापक, कृषि विस्तार शिक्षण डॉ. प्रणाली ठाकरे यांनी मानले.
