जामखेड तालुक्यात लंपी आजाराचा धुमाकूळ, 347 जनावरांवर उपचार सुरू, तर दोन महिन्यात लंपीने घेतले 26 जनावरांचे बळी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून लंपी आजाराने शिरकाव केला आहे. गेल्या दोन महिन्यात या आजारामुळे 26 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जामखेड तालुक्यात 347 जनावरांवर उपचार सुरू आहेत. लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ ही मोहीम हाती घेतली आहे. लंपी स्किन आजाराने थैमान सुरु असल्यामुळे जामखेड तालुक्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जामखेड तालुक्यातील मोहरी गावात लंपीचा पहिला रूग्ण आढळून आला होता. 2 सप्टेंबर रोजी हरिदास गोपाळघरे यांच्या गायीला सर्वात आधी लंपीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर गेल्या दोन अडीच महिन्यांत जामखेड तालुक्यात लंपी स्किन आजार वेगाने फैलावला.आजवर बाधित पशूंची संख्या 894 वर पोहचली आहे. यापैकी 521 जनावरे बरे झाले असून 347 जनावरांवर उपचार सुरू आहेत.
01 ऑक्टोबर रोजी जामखेड तालुक्यात लंपीने पहिला बळी घेतला. बोरले या गावातील आबासाहेब काकडे यांच्या गायीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून आजतागायत तालुक्यातील २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपी आजाराने जनावरांच्या मृत्यूत वाढ होऊ लागल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील आरणगाव, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, हळगाव या भागात लंपीचा जास्त प्रादुर्भाव आहे. पंचायत समिती प्रशासन लंपीबाबत पूर्ण काळजी घेत आहे. गावागावात कीटकनाशकांची फवारणी वरचेवर चालू आहे. माझा गोठा, स्वच्छ गोठा ही मोहीम प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आपल्या गोठ्याची दैनंदिन स्वच्छता ठेवावी. डासांपासून जनावरांचे रक्षण करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यात गायवर्गीय 58891 जनावरे आहेत. यातील 26 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 20 जनावरांचा नुकसानभरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जामखेड तालुक्यातील 100% गायवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून तुलनेने प्रादुर्भाव कमी आहे. तरीही पशुपालकांनी काळजी घ्यावी. घाबरून न जाता तात्काळ पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधावा,असे अवाहन जामखेड पंंचायत समितीचे पशुधन विकास (विस्तार) अधिकारी डॉ. संजय राठोड यांनी केले आहे.