जवळा सोसायटी निवडणूक  : एकास एक लढतीचे स्वप्न भंगले, अपक्ष उमेदवार आणणार निवडणुकीत रंगत

जामखेड, दि 5 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या जवळा सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले. एकास एक लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या पॅनलप्रमुखांचे स्वप्न धुळीस मिळाले, काही जणांनी माघार न घेता उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

जवळा सोसायटीचा पंचवार्षिक निवडणूक यंदा होत आहे. 13 जागेसाठी 64 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत एक अर्ज बाद झाला होता. आज 5 रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. 63 अर्जापैकी 32 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. निवडणुकीत 31 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत.

जवळा सोसायटी निवडणुकीत एकास एक लढत न होता पाच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहेत. यामुळे येथील निवडणूकीत मोठी रंगत येणार आहे. दोन्ही पॅनलकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीचे अनेक प्रयत्न झाले होते. काल रात्री जवळ्यात मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडल्या.

आज 5 एप्रिल रोजी जवळा सोसायटी निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले, दोन्ही पॅनलकडून तसेच पाच अपक्ष यांच्या प्रचाराचा धुराळा मोठ्या दणक्यात उडताना दिसणार आहे. जवळ्याची निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे.

सर्वच नेत्यांना जवळा सोसायटी निवडणुकीच्या माध्यमांतून आपली ताकद आजमावण्याची संधी चालून आली आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांचा राजकीय कस पणाला लागणार आहे.