जामखेड : हळगाव शासकीय कृषि महाविद्यालाच्या वतीने वाघा येथे खरीप पिक संरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाराज व पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी खरीप पिक संरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. जामखेड तालुक्यातील वाघा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जामखेड तालुक्यातील वाघा येथे पार पडलेल्या खरीप पिक संरक्षण मार्गदर्शन कार्यक्रमातून खरीप हंगामात मुख्यत्वे लागवड केल्या जाणार्या मुग, उडीद, तूर, सोयाबीन, कांदा पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, व्यवस्थापन योग्यरीत्या करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील ३३ शेतकरी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील वनस्पती रोगशास्त्र तज्ञ डॉ. मनोज गुड, उद्यानविद्या तज्ञ डॉ. संदीप मोरे, कृषि कीटकशास्त्र तज्ञ डॉ. धनेश्वर पाटील, शेतकरी गटाचे प्रमुख गोकुळ बारस्कर, अध्यक्ष भास्कर बारस्कर, सचिव महेंद्र बारस्कर, खजिनदार रामदास बारस्कर, सल्लागार शहाजी बारस्कर व सभासद अश्रू मते उपस्थित होते.

महाविद्यालयाचे वनस्पती रोगशास्त्र तज्ञ डॉ. मनोज गुड यांनी मुग, उडीद, तूर, सोयाबीन यांवर दिसून येणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन, कृषि कीटकशास्त्र तज्ञ डॉ. धनेश्वर पाटील यांनी मुग, उडीद, तूर, सोयाबीन यांवर दिसून येणाऱ्या किडींचे व्यवस्थापन तर उद्यानविद्या तज्ञ डॉ. संदीप मोरे यांनी कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच, महात्मा फुले कृषि विद्यापीठ उत्पादित बियाणे, रोपे, जैविक खते, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रवे, कृषिदर्शनी यांची माहिती शेतकऱ्यांना दिली व त्याचा वापर शेतीसाठी करण्यास प्रोत्साहित केले. पिक संरक्षण व व्यवस्थापना संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन महाविद्यालयातील तज्ञांनी केले. सदर कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.