जामखेड : ३ कोटी रूपयांच्या निधीतून सटवाईदेवी मंदिर परिसराचा होणार कायापालट, सोमवारी सभापती राम शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जवळे येथील सटवाई देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023-24 अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या 3 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मंदिर परिसरात प्रत्यक्ष विकास कामांची पायाभरणी होणार असल्याने देवीभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामखेड तालुक्यातील जवळके येथे सटवाई देवीचे मंदिर असून ते राज्यातील हजारो भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे. सटवाई देवी मंदिर परिसराचा कायापालट व्हावा यासाठी जवळके ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेऊन विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सटवाई देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी सरकारकडे परिपूर्ण आराखडा सादर केला होता.

महायुती सरकारने सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जवळके येथील सटवाई देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023-24 अंतर्गत तब्बल 3 कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजुर केला होता. या निधीतून भक्तनिवास, सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक, पाण्याची टाकी, संरक्षक भिंत, शौचालय, जोडरस्ते आदी कामे केली जाणार आहेत. या कामांना आता प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.सोमवारी विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
जामखेड तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करून पर्यटनात वाढ व्हावी यासाठी विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्यातील हजारो भाविकांचे हे श्रध्दास्थान असलेल्या जवळके येथील प्रसिद्ध सटवाई देवी मंदिर राज्याच्या पर्यटन नकाशावर यावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी सटवाई देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 3 कोटीचा निधी मंजुर करून आणलाय. या मंजुर निधीतील कामाचा शुभारंभ सटवाई देवी यात्रोत्सवाचे औचित्य साधून सोमवारी होत आहे.
सोमवारी 11 रोजी सटवाई देवी मंदिर परिसरात विविध विकास कामांचा भूमीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 8:30 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी तालुक्यातील देवीभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी व जवळे ग्रामस्थांनी केले आहे.