मोठी बातमी : वाराणसी प्रकरणी सभापती राम शिंदे मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली मोठी मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वाराणसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी संबंधित ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर झालेल्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत त्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे.(Varanasi Manikarnika Ghat issue news today)

२८ व्या कॉमनवेल्थ स्पीकर्स आणि प्रिसायडिंग ऑफिसर्स परिषद (CSPOC) निमित्त दिल्ली दौर्यावर असलेल्या सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज १५ रोजी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाच्या मुद्द्याकडे केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचे लक्ष वेधले.त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवून या प्रकरणाची गंभीरता स्पष्ट केली. यासोबतच संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे व छायाचित्रे सादर करत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
प्रा. राम शिंदे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, १८ व्या शतकातील हा घाट केवळ दगड आणि पायऱ्या बांधकामाचा भाग नसून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीचे, श्रद्धेचे आणि भारतीय सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे.वाराणसी शहर विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या कामामुळे या ऐतिहासिक संरचनेला हानी पोहोचत असल्याची बाब अत्यंत वेदनादायक असून, विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारशाचा नाश होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वनाथ, मणिकर्णिका यांसारख्या पवित्र स्थळांसह देशभरात अनेक घाट, मंदिरे आणि धर्मस्थळांचे पुनरुज्जीवन केले होते. अशा महान वारशाशी निगडित घाटावर पाडकाम होणे हे केवळ ऐतिहासिक नव्हे, तर सांस्कृतिक दृष्ट्याही मोठे नुकसान असल्याचे प्रा. शिंदे यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पुढील कोणतीही हानी तातडीने थांबवावी, संबंधित घाटाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पुनरुज्जीवन करावे आणि वारसा संवर्धनाच्या दृष्टीने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.
तसेच या विषयावर थेट चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करणार असून, लवकरच लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊनही सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.
वाराणसीच्या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद
वाराणसीतील मणिकर्णिका घाट परिसरात सुरू असलेल्या पुनर्विकासादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक घाट आणि त्यासंबंधित संरचनांचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. विकासाच्या नावाखाली १८व्या शतकातील वारसास्थळावर पाडकाम झाल्याने देशभर संताप व्यक्त होत. अहिल्या भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याशी भावनिक आणि सांस्कृतिक नाते असलेल्या लाखो नागरिकांसाठी हा घाट श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहून सरकारकडून तातडीची पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.