जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या ‘सर्वांना समान संधी’ फॉर्म्यूल्याने सुटला बाजार समितीच्या उपसभापतीपदाचा तिढा, जामखेड बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडीचा तिढा आज ११ रोजी सुटला. यापदासाठी अनेक जण इच्छूक होते. परंतू विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी उपसभापती निवड करताना ‘सर्वांना समान संधी’ हा फॉर्म्यूला ठरवत पुढील तीन वर्षासाठी तीन संचालकांना संधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नंदकुमार गोरे यांना उपसभापती पदासाठी पहिल्यांदा संधी देण्यात आली. बाजार समितीवर आता भाजपची एक हाती सत्ता आली आहे. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांवर युवा नेतृत्वाला काम करण्याची संधी सभापती शिंदे यांनी दिली.

२०२३ साली जामखेड बाजार समितीची सार्वत्रिक निवडणुक पार पडली होती.या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही गटाच्या ९-९ जागा निवडून आल्या होत्या. सभापती व उपसभापती निवडणूकीत चिठ्ठीद्वारे सभापती भाजपचा तर उपसभापती राष्ट्रवादीचा झाला होता.बाजार समितीचा कारभार करताना दोन्ही गटांत नेहमी कुरबुरी व्हायच्या. गेल्या दोन वर्षांत बाजार समितीतील विकास कामांमध्ये रोहित पवार गटाकडून वारंवार अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी गटाकडून केला जात होता. बाजार समितीवर एकहाती सत्तेसाठी भाजपला बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी तीन सदस्यांची आवश्यकता होती.

जामखेड बाजार समितीवर एक हाती वर्चस्व असावे, सभापती व उपसभापती दोन्ही भाजपचेच व्हावेत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून यंत्रणा कामाला लागली होती. त्यानुसार त्या यंत्रणेला मोठे यश मिळाले. रोहित पवार गटातील जेष्ठ संचालक अंकुश ढवळे, राहुल बेदमुथा आणि नारायण जायभाय या तिघांनी शेतकरी हितासाठी बंडखोरी सभापती राम शिंदे नेतृत्वाखाली भाजपात दाखल झाले आणि भाजपचे बाजार समितीत बहुमत झाले. त्यानंतर रोहित पवार गटाचे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. अविश्वास ठरावाच्या दिवशी उपसभापती कैलास वराट यांनी राजीनामा दिला. त्यानुसार ते या पदावरून पायउतार झाले.

उपसभापती कैलास वराट यांच्यानंतर सत्ताधारी भाजपकडून कोणत्या संचालकाच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यापदासाठी सुरुवातीपासून नंदकुमार गोरे हे प्रबळ दावेदार होते. त्याशिवाय सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप हे संचालक सुध्दा या स्पर्धेत होते. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे उपसभापतीपदाच्या निवडीच्या दिवशी काय निर्णय घेणार ? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. तत्पूर्वी यापदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांनी ‘आपलाच दावा’ कसा योग्य आहे हे प्रा राम शिंदे यांना पटवून देण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली होती.
दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी सभापती प्रा.राम शिंदे यांनी चोंडी येथील निवासस्थानी बाजार समितीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उपसभापती निवडणूक संदर्भात प्रा शिंदे यांनी सर्व संचालकांचे म्हणणे ऐकुन सविस्तर संवाद साधला. सर्व संचालकांनी निर्णयाचे सर्व अधिकार प्रा शिंदे यांना दिले होते. आज ११ रोजी उपसभापती निवडणुकीची प्रक्रिया होती. प्रा शिंदे यांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाजार समिती उपसभापती निवडीसंदर्भातला आपला निर्णय सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केला.
सभापती प्रा राम शिंदेंचा निर्णय जाहीर आणि पुढील सुत्रे वेगाने हलली
प्रा राम शिंदे यांनी जामखेड बाजार समिती उपसभापती पदासाठी पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी तिघांना समान संधी देण्यात येईल, असे घोषित केले.वर्तमान उपसभापतीचा राजीनामा घेऊन नवीन उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रत्येक जुन महिन्यात ठरविण्यात येईल. तसेच आज ११ रोजी होणाऱ्या उपसभापती निवडणूकीसाठी नंदकुमार प्रकाश गोरे हे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. त्यानुसार नंदकुमार गोरे यांची जामखेड बाजार समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.
जामखेड बाजार समिती उपसभापती निवडणूक प्रक्रिया कशी पार पडली ?
सभापती प्रा राम शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर नंदकुमार गोरे यांनी आज ११ रोजी उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी दाखल केला. त्याचबरोबर विरोधी गटाकडून सतिश शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सत्ताधारी गटात गडबड गोंधळ होऊन बंडखोरी होईल या आशेवर असलेल्या विरोधी गटाचा पुरता हिरमोड झाला. सभापती प्रा राम शिंदे यांनी घेतलेला निर्णय आणि त्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानत भाजपच्या सर्व संचालकांनी नंदकुमार गोरे यांच्या पाठीशी एकजूट दाखवली.

अर्ज छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर विरोधी गटाचे उमेदवार सतीश शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपचे उमेदवार नंदकुमार गोरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांनी नंदकुमार गोरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड घोषित केली.
ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन दिलीप तिजोरे, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद उपसचिव शिवाजी ढगे यांनी कामकाज पाहिले. नंदकुमार गोरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
निवडीनंतर उपसभापती नंदकुमार गोरे काय म्हणाले ?
निवडीनंतर उपसभापती नंदकुमार गोरे म्हणाले की, सभापती राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. मार्केट कमिटीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सभापती शरद कार्ले व सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम केले. बाजार समितीचा राज्यात नावलौकिक होईल असे काम करू. आमचे नेते प्रा राम शिंदे यांची मान राज्यात उंचावेल असा कारभार आम्ही करू, असे ते म्हणाले.
यावेळी बाजार समितिचे सभापती शरद कार्ले पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, माजी उपसभापथी रविंद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, संचालक गौतम उतेकर अंकुशराव ढवळे, नारायण जायभाय, सचिन घुमरे, डॉ गणेश जगताप, राहुल बेदमुथ्था वैजिनाथ पाटील, विष्णु भोंडवे, सिताराम ससाणे रविंद्र हुलगुंडे, डॉ अल्ताफ शेख, अजय सातव, गोरख घनवट, उध्दव हुलगुंडे, तसेच विरोधी गटाचे संचालक सुधीर राळेभात, कैलास वराट, सौ. रतन चव्हाण, सतिश शिंदे, सुरेश पवार, अनिता शिंदे हे उपस्थित होते. सर्वांनी गोरे यांना शुभेच्छा दिल्या.