ऐन दिवाळीत जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप : ग्रामपंचायत पदाधिकारी व शेकडो समर्थकांसह प्रशांत शिंदे यांचा भाजपात प्रवेश, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत चोंडीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना राजकीय धक्का देणारी मोठी घडामोड जामखेड तालुक्यातून समोर आली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी जवळा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच व दहा ग्रामपंचायत सदस्य तसेच आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. प्रशांत शिंदे यांच्या निर्णयामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या जवळा ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला जामखेड तालुक्यात मोठे भगदाड पडले आहे. जवळा ग्रामपंचायतवर आता भाजपचा कब्जा झाला आहे.

big earthquake in politics of Jamkhed on Diwali, youth leader Prashant Shinde with hundreds of supporters join for BJP, joined BJP in presence of MLA Prof. Ram Shinde,

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागलेल्या जवळा ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीत प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळा ग्रामविकास पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत ग्रामपंचायतवर कब्जा मिळवला होता. आमच्या विजयात कोणत्याच राजकीय पक्षाचा संबंध नसून हा विजय जनतेचा व जवळा ग्रामविकास पॅनलचा आहे अशी घोषणा प्रशांत शिंदे यांनी विजयानंतर केली होती. त्यामुळे जवळा ग्रामपंचायतवर नेमके कोणत्या पक्षाचे वर्चस्व याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जवळा ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर प्रशांत शिंदे व त्यांच्या हजारो समर्थकांनी पुन्हा स्वगृही भाजपात  परतण्याचा निर्णय घेतला.

big earthquake in politics of Jamkhed on Diwali, youth leader Prashant Shinde with hundreds of supporters join for BJP, joined BJP in presence of MLA Prof. Ram Shinde,

रविवारी ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी युवा नेते प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे या सर्वांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी भव्य सत्कार संपन्न झाला.

big earthquake in politics of Jamkhed on Diwali, youth leader Prashant Shinde with hundreds of supporters join for BJP, joined BJP in presence of MLA Prof. Ram Shinde,

यावेळी जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली अण्णा हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे, राहुल पाटील, सोमनाथ वाळुंजकर, तुकाराम भाऊसाहेब हजारे, प्रमोद कोल्हे, एकनाथ हजारे, अनंता लेकुरवाळे, दीपक देवमाने, महेंद्र खेत्रे, सावता हजारे, पांडुरंग रोडे, डॉ ईश्वर हजारे, तानाजी पवार, राहुल मासोळे, अनिल माने, नाना कोल्हे, राष्ट्रपाल आव्हाड सह आदी उपस्थित होते.

म्हणून आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला – प्रशांत शिंदे

राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानंतर युवा नेते प्रशांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादीत काम करत असताना विकास कामांच्या बाबत असो की इतर काही ग्रामपंचायतचे कामं असतील, ते कामं करत असताना मला आलेला जो अनुभव आहे तो खूपच अपेक्षाभंग करणारा होता. ग्रामपंचायतच्या कामात त्यांची हस्तक्षेप करण्याची जी पध्दत आहे. ती पाहता मला नक्कीच आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्या कारभाराची आठवण झाली, असे प्रशांत शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, आमदार प्रा.राम शिंदे हे पालकमंत्री असताना त्यांनी कधीच आमच्या कारभारात हस्तक्षेप केला नव्हता. उलट त्यांनी आम्हाला गावचा कारभार करताना मोकळीक दिली होती. परंतू राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि चित्रच बदललं, आमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप वाढला होता.

ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचं लेबल लावलं नव्हतं, निवडणूक पुर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाचा विकास करायचा असेल आणि गावाला वेगळेपण द्यायचं असेल तर आमदार प्रा.राम शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही. गावकारभाऱ्यांना काम करताना शिंदे साहेब नेहमी मोकळीक देतात. यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकमुखी निर्णय घेत आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे व आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, अशी भावना यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केली.

.. म्हणून आमच्या विठ्ठलाकडे पुन्हा आलोय – सरपंच सुशिल आव्हाड

आमच्या विठ्ठलाचे जे बडवे कान भरत होते ते सगळेच ग्रामपंचायत निवडणुकीत पडलेत. ग्राऊंड लेवलची खरी परिस्थिती न सांगता बडवे आमच्या विठ्ठलाचे आमच्या विरोधात कान भरत होते. परंतू जनतेने त्या बडव्यांना नाकारले आहे. ग्राऊंडवर खरं कोण काम करत होतं हे जनतेने दाखवून दिलं आहे. जनतेने आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिलं आहे. आता आम्ही पुन्हा आमच्या विठ्ठलाकडे परत मोकळ्या मनाने आलो आहोत.शिंदे सरांनीही आम्हाला मोकळ्या मनाने स्विकारावं, अशी भावना जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

जवळा ग्रामस्थांना आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली दिवाळी मोठी भेट

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जवळा ग्रामपंचायतचे सरपंच व 10 ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी आमदार प्रा.राम शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्यानंतर आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळा ग्रामस्थांसाठी दिवाळीचे मोठे गिफ्ट देत आमदार निधीतून जवळा गावासाठी 25 लाख रूपये निधीची घोषणा केली. यावेळी आमदार शिंदे यांनी 25 लाख रूपये निधीचे पत्र युवा नेते प्रशांत शिंदे, काकासाहेब वाळुंजकर, राहूल वाळुंजकर यांना सोपवले. हा निधी जवळा गावात उभारण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालयासाठी देण्यात आला आहे. यापुर्वी 25 लाख रूपये मंजुर झाले होते. आता आणखीन 25 लाख असे एकुण 50 लाख रूपये खर्चाचे भव्य ग्रामसचिवालय जवळा गावात उभारले जाणार आहे.

पक्षात आलेल्या सर्वांचा मानसन्मान राखला जाईल – आमदार प्रा.राम शिंदे

यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, जवळा गावावर पहिल्यापासून माझे प्रेम राहिलेले आहे. मला नेहमी जवळा गावाने भरभरून प्रेम दिले आहे. जवळा गावाच्या विकासासाठी आजवर भरघोस निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ देणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल. प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षात प्रवेश केलाय. त्या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत. पक्षात आलेल्या सर्वांचा मानसन्मान राखला जाईल. तुमच्या स्वागतालाच 25 लाख रूपयांचा निधी देऊन तुमचा सन्मान केलेला आहे. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व नेते कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन व सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत. सर्वांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.

या पक्ष प्रवेशावेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले, संचालक सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचरणे, डाॅ सुनिल गावडे, तुषार पवार, अनिल गदादे, पांडुरंग उबाळे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, बापुराव ढवळे, सह आदी उपस्थित होते.