Sanju Samson: कोलकात्यात संजू सॅमसनचा कहर! वेस्ट इंडिजचा पराभव; संजूची ९७ धावांची वादळी खेळी, भारत पोहचला सेमीफायनलमध्ये!
कोलकाता | आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला.जो चाहत्यांना वर्षानुवर्षे स्मरणात राहील. आजच्या लढतीत संजू सॅमसन (sanju samson) नावाचे वादळ घोंगावले. संजूने कॅरेबियन गोलंदाजांची पिसं काढत ९७ धावांची ऐतिहासिक वादळी खेळी साकारली आणि भारताला दिमाखात उपांत्य फेरीत (Semifinals) पोहोचवले. संजूच्या वादळापुढे वेस्ट इंडिजचे पानिपत झाले.

टी २० विश्वचषक स्पर्धेत आज १ मार्च सुपर ८ गटातील शेवटचा सामना होता. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांसाठी करा किंवा मरा अशी स्थिती होती. जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाणार असे या सामन्याचे गणित होते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय सुरुवातीला फसला की काय, असे वाटत होते. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच जोरदार हल्ला चढवला.

वेस्ट इंडिज कडून रोस्टन चेस (४०) आणि शाई होप (३२) यांनी भक्कम पाया रचला. मधल्या फळीत रोव्हमन पॉवेल (३४) आणि जेसन होल्डर (३७) यांनी अवघ्या ३५ चेंडूत ७६ धावांची अभेद्य भागीदारी करत धावसंख्या १९५/४ पर्यंत नेली. भारताकडून जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या. मात्र, अभिषेक शर्माकडून सुटलेला एक सोपा झेल भारताला महागात पडला आणि विंडीजने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
१९६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, पाठोपाठ इशान किशनही स्वस्तात बाद झाला. मात्र दुसरा सलामीवीर संजू सॅमसन याने आज मैदान गाजवायचेच या इराद्याने मैदानात धुमाकूळ घातला. कॅरेबियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. संजूने मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटकेबाजी केली. त्याला युवा तिलक वर्माने २७ धावांची अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक साथ दिली. कर्णधार सूर्याने काही आक्रमक फटके मारून धावगती कायम ठेवली.
अखेरच्या क्षणी उत्कंठा आणि ‘विजयी चौकार’
सामना शेवटच्या टप्प्यात आला असताना हार्दिक पंड्या (१७) बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या शिवम दुबेने संजुची साथ दिली. मैदानावर ढाल बनून उभा असलेल्या संजुने विजयी चौकार लगावत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे संजू सॅमसन, ज्याने आपल्या वादळी फलंदाजीने कॅरेबियन गोलंदाजांची दाणादाण उडवली.संजूने ९७ धावांच्या तुफानी खेळीत ४ उत्तुंग षटकार आणि १२ चौकार ठोकले. त्याने ५० चेंडूत ९७ धावांची नाबाद आक्रमक खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
संजु सॅमसन ठरला सुपर हिरो !
शतकाच्या जवळ असतानाही त्याने चुकीची फटकेबाजी करण्याचा मोह आवरला. शतकापेक्षा, वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा त्याने संघाच्या विजयाला महत्त्व दिले आणि शानदार विजयी चौकार मारून भारताचे सेमीफायनलचे तिकीट फायनल केले. संजूच्या या खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो भारतीय क्रिकेटचा खरा ‘मॅच विनर’ आहे. संजु आज खऱ्या अर्थाने सुपर हिरो ठरला. विजयी चौकार मारल्यानंतर त्याने कुठलाही जल्लोष न करता मैदानावर बसून हात उंचावून देवाचे आभार मानले. संजूला मॅन ऑफ दी मॅच देण्यात आला.

या विजयामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका सुपर-८ च्या ग्रुप-१ मधून पात्र ठरले आहेत. आता भारताचा उपांत्य फेरीचा सामना ५ मार्च रोजी मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
- वेस्ट इंडिज फलंदाजी
- शाई होप – ३२ (३३)
- रोस्टन चेस – ४० (२५)
- शिमरॉन हेटमायर – २७ (१२)
- शेरफेन रदरफोर्ड – १४ (९)
- रोव्हमन पॉवेल – ३४ (१९)
- जेसन होल्डर – ३७ (२२)
- भारत फलंदाजी
- अभिषेक शर्मा – १० (११)
- संजू सॅमसन – ९७ (५०)
- इशान किशन – १० (६)
- सूर्यकुमार यादव – १८ (१६)
- तिलक वर्मा – २७ (१५)
- हार्दिक पंड्या – १७ (१४)
- शिवम दुबे – ८ (४)