जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कधी होणार ? याकडे डोळे लावून बसलेल्या सर्वपक्षीय इच्छूक उमेदवारांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निवडणूकीच्या हालचाली वाढल्या असून प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा होणार की लाॅटरी लागणार याचा फैसला आता आरक्षण सोडतीच्या मुहूर्तातून होणार आहे. लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्याआधी उमेदवारीच्या तयारीत असलेल्या इच्छूकांनी भेटीगाठी घेत गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गावोगावचे राजकारण तापू लागले आहे. (Jamkhed Panchayat Samiti Election 2025-26 )

जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासनाने २२ रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. त्यानुसार जामखेड तालुक्यात खर्डा, जवळा आणि साकत हे जिल्हा परिषद गट व जवळा, अरणगाव, खर्डा, दिघोळ, साकत, शिऊर असे सहा पंचायत समिती गण निश्चित झाले आहेत.लवकरच या निवडणूका होणार आहेत. जामखेड नगरपरिषद स्थापनेमुळे एक जिल्हा परिषद गट कमी झाला होता, परंतू वाढत्या लोकसंख्येच्या निकषावर तालुक्यात यंदा एक जिल्हा परिषद गट वाढला आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय पटावर जोरदार हालचाली वाढल्या आहेत.तीनही गटात आणि सहाही गणात सर्वपक्षीय इच्छूकांचा भरणा अधिक आहे.इच्छुकांनी गावोगावी भेटीगाठी हाती घेतल्या आहेत.भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, आरपीआय, इतर संघटना यांचे शिलेदार निवडणूकीच्या मैदानात आपले नशिब आजमावण्याच्या तयारीत आहेत. जुन्या नेत्यांसह नव्या दमाच्या तरूण कार्यकर्त्यांनी निवडणूकीची तयारी हाती घेतली आहे. आपला दावा प्रबळ व्हावा यासाठी इच्छूकांनी कंबर कसली आहे.
अंतिम प्रभाग रचनेनंतर गट व गणात जातीय समीकरणे काय आहेत ? हे तपासून गोळाबेरजेचा ‘प्राथमिक सारीपाट’ मांडण्यात इच्छूक आणि त्यांचे म्होरके कामाला लागले आहेत.जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या उमेदवारांच्या नजरा आता आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. आरक्षण सोडतीच्या मुहूर्तातूनच या इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा होणार की लाॅटरी लागणार याचा फैसला होणार आहे. येत्या काही दिवसांत आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतर निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
तूर्तास आरक्षण सोडतीची प्रर्वा न करता ‘इच्छूक’ आपापल्या मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहेत.गावागावात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिथे गर्दी तिथे निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. गावपुढार्यांचे गट पुन्हा सक्रीय झाले आहेत. फक्त निवडणुकीत सक्रीय दिसणारे तथाकथित नेतेही बिळातून बाहेर आले आहेत. ‘गावात जो इच्छूक जाईल तो आपलाच, अश्या साखरपेरणीचा शुभारंभ झाला आहे.’ यातून गावोगावचे वातावरण चांगले तापताना दिसू लागले आहे.
मुख्य मुद्दे :
- अंतिम प्रभाग रचना जाहीर – जामखेड तालुक्यात ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समिती गण निश्चित.
- इच्छुकांची धावपळ – सर्वपक्षीय इच्छुक गावोगावी, भेटीगाठी व गोळाबेरीज सुरू.
- आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष – उमेदवारांचे राजकीय भविष्य आरक्षणावर ठरणार.
- गावोगावचे तापलेले वातावरण – निवडणूक चर्चेत, गावपुढारी व कार्यकर्ते सक्रीय.
- नवे-तरुण उमेदवारही मैदानात – जुन्या नेत्यांसह तरुण पिढीचा जोश.
Q1. जामखेड तालुक्यात किती जिल्हा परिषद किती गट आहेत?
👉 जामखेड तालुक्यात खर्डा, जवळा आणि साकत असे एकूण ३ जिल्हा परिषद गट निश्चित झाले आहेत.
Q2. जामखेड पंचायत समिती निवडणुकीसाठी किती गण निश्चित झाले आहेत?
👉 जवळा, अरणगाव, खर्डा, दिघोळ, साकत आणि शिऊर असे ६ गण जामखेड पंचायत समिती निवडणूकीसाठी निश्चित झाले आहेत.
Q3. निवडणुकीचे खरे चित्र कधी स्पष्ट होईल?
👉 आरक्षण सोडतीनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल. निवडणूक दिवाळीत किंवा दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे.
Q4. इच्छुक उमेदवार काय करत आहेत ?
👉 गावोगावी भेटीगाठी, मतदारांशी संवाद आणि गोळाबेरीज सुरू आहे.