जामखेड : नान्नज प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नान्नज प्रकरणातील साळवे कुटुंबातील जखमींची गुरुवारी भेट घेतली.पुण्यातील ससुन रूग्णालयात जाऊन त्यांनी साळवे कुटूंबातील सदस्यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. प्रकृतीची माहित घेत त्यांना धीर दिला. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सुचना त्यांनी रूग्णालय प्रशासनाला दिल्या. नान्नज प्रकरणातील आरोपींवर मकोका (MCOCA – Maharashtra Control of Organised Crime Act) कायद्यान्वये कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर एका टोळक्याने रविवार दि, २४ ऑगस्टच्या रात्री जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ जण जखमी झाले होते.यातील गंभीर जखमींवर पुण्यातील ससुन रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या जखमींची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी रात्री ससुन रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली.
यावेळी आठवले यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्याकडून त्यांनी घटनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली. घाबरू नका,मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असा धीर आठवले यांनी सुनिल साळवे आणि त्यांच्या कुटूंबाला दिला.
