जामखेड दुहेरी हत्याकांडाचा निकाल जाहीर : एकास जन्मठेप तर 13 जणांची निर्दोष मुक्तता !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । संपुर्ण राज्यात गाजलेल्या राळेभात बंधू हत्याकांड प्रकरणाचा श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी अंतिम निकाल सुनावला. यात एकास जन्मठेपेची तर 13 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालाकडे संपुर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले होते.

Yogesh Ralebhat and Rakesh Ralebhat murder case Result of Jamkhed double murder announced, one person sentenced to life imprisonment and 13 persons acquitted

राजकीय वादातून राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची 28 एप्रिल 2018 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही घटना जामखेड बाजार समिती समोरील हाॅटेल परिसरात घडली होती. या घटनेने संपुर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या घटनेत 14 जणांना आरोपी करण्यात आले होते.

सदर घटनेचा खटला श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. बहुचर्चित खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी शुक्ला यांच्यासमोर पूर्ण झाली.या प्रकरणात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली होती.

राजकीय वादासह पोस्टर फाडल्याच्या रागातून राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचं वातावरण ढवळून निघालं होतं. राजकीय वर्चस्वाचे रूपांतर दुहेरी हत्येपर्यंत झाल्याने मोठी खळबळ माजली होती.

पोलिसांनी सदर गुन्ह्यात गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तत्कालीन पोलीस उपधीक्षक सुदर्शन मुंडे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी होते.

खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला.

सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज 28 डिसेंबर 2022 रोजी श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सदर खटल्याचा अंतिम निकाल जाहिर केला. न्यायालयाने जाहीर केलेल्या निकालानुसार स्वामी ऊर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर कैलास विलास माने, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काकासाहेब बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव या 13 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.