मोठी बातमी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांकडून शेतकऱ्यांना मिळाले दिवाळीचे मोठे गिफ्ट, जामखेड दौर्यात केल्या तीन मोठ्या घोषणा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 24 ऑक्टोबर 2022 । जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार राम शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या समवेत जामखेड तालुक्यातील खर्डा गटातील मोहरी, जायभायवाडी, तेलंगशी या गावांचा पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्त भागांमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जात पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना धीर दिला. त्यानंतर पार पडलेल्या आढावा बैठकीत अनेक महत्वाच्या घोषणा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्या.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सितारामगड येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत आज 24 रोजी प्रशासकीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्याबरोबरच आनंदाचा शिधा या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महत्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, आगोदर आमचा विचार होता की, चोंडीला जाऊन पाहणी करायची, परंतू राम शिंदे साहेबांनी आग्रहाने सांगितलं की, खर्डा भागात परतीच्या पावसाने जास्त नुकसान झाललं आहे. त्यांच्या सूचनेवरून, खर्डा भागातील जायभायवाडी, मोहरी, तेलंगशी या नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे पाहणं हा या दौर्याचा उद्देश होता.
मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही
“कधी कधी अहवालामध्ये आणि शेतातली परिस्थिती यामध्ये खूप विसंगती पाहायला मिळते. राज्याचा महसूल मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती की, प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी. वस्तुस्थिती समजून घ्यावी.शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. त्यामध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी हा पाहणी दौरा आयोजित केला होता असे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.”
विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष
“परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला वस्तुस्थिती आहे. काही भागात सोयाबीन गेलयं, काही भागात उडीद गेलयं, खर्डा परिसरात पुर्वी उडदाचं प्रमाण जास्त होतं, ते कमी करून शेतकऱ्यांनी आता सोयाबीन प्रमाण जास्त केलं. निसर्गाचा कोप आपल्या कोणाच्या हातात नाहीये. बदलत्या हवामानाचे परिणामाला सामोरे जाणे क्रमप्राप्त आहे, असे सांगत विखे पाटील म्हणाले कि ,विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे. खाजगी विमा कंपन्यांकडून जो काही विम्याचा हप्ता घेतला जातो, मात्र शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी मदत शेतकऱ्यांना मिळत नाही,गेल्या वर्षी पिकांचे नुकसान कमी प्रमाणात झाल्यामुळे विम्याचे कमी पैसे मिळाले. परंतू अधिकाधिक नुकसान झाल्यानंतर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी हे आमचे धोरण आहे, असे विखे-पाटील म्हणाले.”
72 तासांची अट शिथील करणार
“72 तासामध्ये विमा कंपन्यांना माहिती कळवणे ही अट शिथील करण्याची गरज आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात कृषीमंत्री, सचिव लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे मंत्रालयात आयोजन केले आहे. या बैठकीत 72 तासांची अट शिथील करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे 72 तासाच्या आत आम्हाला कळवलं नाही अशी संधी विमा कंपन्यांना संधी मिळणार नाही, पैसा सरकारचाय, पैसा शेतकऱ्यांचा आहे. तुमच्या अटी घालून चालणार नाही. शासनाच्या अटी तुम्ही मान्य केल्या पाहिजेत. त्या पध्दतीने आपण कार्यवाही करू,अशी मोठी घोषणा यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.”
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश
“जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे साधारणता: 25 हजार 685 शेतकऱ्यांचं 15 हजार 269 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 16 हजार 682 शेतकऱ्यांचे 9 हजार 778 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे प्रशासनाने पुर्ण केले आहेत. लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की, सरसकट पंचनामे होणार आहेत का ? ज्या भागात अतिवृष्टीचं नुकसान नाहीये तिथले सगळे तलाठी आणि सर्कल नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यासाठी पाठवा अश्या सुचना जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत. पुढील तीन दिवसांत 100 टक्के पंचनामे झाले पाहिजेत अश्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तुमची जी मागणीय, सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, त्याही सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याच पध्दतीने कार्यवाही होईल, अशी मोठी घोषणा यावेळी विखे-पाटील यांनी केली.”
ऑफलाईन पिक पाहणी नोंदी घेण्याच्या सुचना
विखे-पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आपली जी मागणी होती की मोबाईलला रेंज मिळत नाही, म्हणून आम्ही आता ते ऑनलाईन होणं शक्य व्हावं म्हणून ऑफलाईन पिक पाहणी नोंदी घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे मोबाईलला जरी रेंज नसली तरी आम्ही रेंजमध्ये आहोत. त्यामुळे ऑफलाईनमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या सगळ्या नोंदी होतील यासाठी प्रशासनाला आदेश दिले अशी घोषणा यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
65 मिलीमीटरच्या अटीच्या त्रुटी दुर करणार
“आढावा बैठकीत 65 मिलीमीटरची अट शिथील करावी,अशी मागणी करण्यात आली होती या मागणी वर बोलताना विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने मागील तीन वर्षे ही अट घातली होती परंतू आपल्या सरकारने या वर्षी ती अट शिथील केली. तसेच फडणवीस सरकारच्या काळातही ही अट शिथील होती. 65 मिलीमीटरच्या अटी संदर्भात अजूनही काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यात काही अडचणी येत आहेत. त्यामुळे या अटीत सुधारणा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.”
मदतीचा हात आखडता घेणार नाही, मोकळ्या हातानं मदत करणं ही शासनाची भूमिका
“आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही, त्या उलट आपण ज्या अटी शिथील केल्या आहेत त्यामध्ये दोन हेक्टरची अट होती, ज्या काही भागांमध्ये लोकांकडे जमिनींची धारणा जास्त आहे त्याच्यासाठी तीन हेक्टरची अट केली. मदतीची मर्यादा वाढवली. असे सांगत विखे-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना शासन कुठेही दुजाभाव करणार नाही, मदतीचा हात आखडता घेणार नाही, मोकळ्या हातानं मदत करणं ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे पंचनामे होणार नाहीत, पंचनाम्या अभावी काही लोकं राहतील हे मनातलं काढून टाका. शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणे ही आमचीच भूमिका नाहीये, त्यामुळे काळजी करू नका. सरकारकडून भरीव मदत केली जाईल असे सांगत विखे-पाटील यांनी मोठा दिलासा दिला.”
नापेर जमीनीबाबत लवकरच निर्णय
“सततच्या पावसामुळे जमीनी नापेर राहण्याची शक्यता आहे यावर विखे पाटील म्हणाले की, सततच्या पावसामुळे अथवा अतिवृष्टीमुळे जमीनी नापेर राहणार आहेत ही वस्तुस्थिती आहे. यावर स्वतंत्र चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.”
यंदा जामखेड तालुक्यात 16 हजार 756 हेक्टर क्षेत्र पीक विम्यासाठी संरक्षित
“गेल्या वर्षी जामखेड तालुक्यातील 20 हजार शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. 12 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित होतं, साधारण संरक्षित रक्कम 3 हजार 800 कोटी इतकी होती. यंदा HDFC विमा कंपनीकडे जामखेड तालुक्यातील 30 हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तर 16 हजार 756 हेक्टर क्षेत्र संरक्षित आहे. तर संरक्षित रक्कम 4 हजार 800 कोटी रूपये आहे.”
जामखेड तालुक्यात 9 हजार 778 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पुर्ण
“जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे साधारणता: 25 हजार 685 शेतकऱ्यांचं 15 हजार 269 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 16 हजार 682 शेतकऱ्यांचे 9 हजार 778 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे प्रशासनाने पुर्ण केले आहेत.”