जामखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका, अवकाळी पावसाने केली राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीची पोलखोल, अनेक भागांत पाणी शिरले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहर आणि तालुक्यातील हळगाव, जवळा, नान्नजसह आदी भागात गुरूवारी (२ रोजी) रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला. शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीची उपयुक्तता पहिल्याच पावसात फेल ठरली. अनेक भागांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. महामार्गाच्या बोगस कामाची अवकाळी पावसाने पोलखोल केली.

गुरुवारी दिवसभर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. दोन तास हा पाऊस पडत होता. जोरदार वादळी वार्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला, कांदा भिजण्याच्याही घटना अनेक ठिकाणी घडल्या. तसेच शेतीपिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पुढील दोन दिवस धोक्याचे
पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे असणार आहेत. ३ व ४ एप्रिल रोजी जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याला ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिक व शेतकरी बांधवांनी वादळी पावसाच्या काळात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या बोगस कामाची अवकाळी पावसाने केली पोलखोल
गुरूवारी रात्री जामखेड शहरात वादळी पाऊस झाला. जोरदार अवकाळी पावसाने शहरात पाणीच पाणी केले होते. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 D च्या कडेला असलेल्या अनेक भागात पाणी शिरले. महामार्गाच्या ड्रेनेज व्यवस्थेचे पहिल्याच पावसाने धिंडवडे काढले. महामार्गाच्या अपुर्ण आणि बोगस कामामुळे आधीच वैतागलेल्या जामखेडकरांच्या मनस्तापात आणखीन भर पडली.

पावसाळा जवळ येऊन ठेपलाय. त्या आधी महामार्गाचे काम मार्गी लागणे अपेक्षित आहे. जर काम पुर्ण नाही झाले तर शहरातील नागरिकांना, प्रवाश्यांना, वाहन चालकांना असाच जाच सहन करण्याची वेळ ओढवणार आहे. प्रशासन जामखेडकरांचा हा त्रास दुर करणार का ? याकडे सर्वांचे लागले आहे.