स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येकाने तत्परता, तपश्चर्या, तेजस्विता या त्रिसुत्रीचा अवलंब करावा – जिल्हा कृषि विकास अधिकारी सुधीर शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कृषि क्षेत्र खूप व्यापक असून सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षणसोबतच तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने कृषि महाविद्यालये स्थापन केलेली आहेत. कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे प्रवेश घेतलेले विद्यार्थी भाग्यवान आहेत. सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा सदुपयोग करावा तसेच कृषि क्षेत्रात व्यवसाय विकासास भरपूर संधी उपलब्ध असून तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आपआपल्या क्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण करावेत असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव, ता. जामखेड येथे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ व्याख्यानमाला ‘स्पर्धा परीक्षांची तयारी व कृषि क्षेत्रातील संधी’ याविषयावर ते बोलत होते.

प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन ‘त’ महत्वाची भूमिका बजावतात. पहिला ‘त’ म्हणजे तत्परता, दुसरा ‘त’ म्हणजे तपश्चर्या आणि तिसरा ‘त’ म्हणजे तेजस्विता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली दिनचर्या या तीन ‘त’ च्या मार्गाने करावी. जीवनाचे ध्येय निश्चित करावे. कृषि पदवीचे शिक्षण घेत असताना रोज व्यायाम, प्राणायम, वाचन, मनन, स्वत: सोबत सुसंवाद इत्यादींचा अवलंब करावा. स्पर्धेच्या युगात टिकावयाचे असेल तर श्रमाशिवाय पर्याय नाही असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व सर्व उपक्रमांत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपले ध्येय निच्छित करावे व त्यामार्गाने जावून त्यात सातत्यता ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. प्रेरणा भोसले, मुख्य समुपदेशक डॉ. गोकुळ वामन, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रेरणा भोसले यांनी केले. प्रमुख अतिथींची ओळख डॉ. निकिता धाडगे यांनी करून दिली. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे नव्याने प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक वाळूंजकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उत्कर्षा गवारे यांनी तर डॉ. संदीप मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.