Raj Thackeray Uddhav Thackeray together : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राज ठाकरे उध्दव ठाकरे एकत्र!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Raj Thackeray Uddhav Thackeray together : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आज समोर आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर जात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले. ठाकरे बंधूंमधील वाढती जवळील मनसे शिवसेना युतीच्या चर्चांना अधिक बळकट करणारी ठरू लागली आहे. (Raj Thackeray Uddhav Thackeray together)

ठाकरे बंधू एकत्र येणार, मनसे शिवसेना युती होणार, अश्या चर्चा राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चांचा जोर वाढलेला असतानाच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शिवसेना सोडल्यापासून राज ठाकरे मातोश्रीवर जाण्याची आजची दुसरी वेळ होती. मनसे आणि शिवसेनेसाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

उध्दव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे स्वता:हून मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या समवेत बाळा नांदगावकर आञि नितिन सरदेसाई हे होते. यावेळी राज ठाकरेंनी उध्दव ठाकरे यांची गळाभेट घेतली. मातोश्रीवर राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी गुलाबाच्या फुलांचा मोठा गुच्छ भेट देत उध्दव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी ठाकरे बंधुंचे कौटुंबिक मनोमिलन झाल्यायाचे पहायला मिळावे. उध्दव ठाकरे यांनी मोठ्या आनंदाने राज ठाकरे यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. या ऐतिहासिक क्षणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत सह आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान आजचा क्षण हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंगी मातोश्रीवर गेले होते. जानेवारी 2019 नंतर पहिल्यांदा राज ठाकरे आज मातोश्रीवर पोहोचले . 2019 मध्ये अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले होते. अशातच शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर आले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. कौटुंबिक मनोमिलनानंतर राजकीय मनोमिलन होणार का आणि आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय युती पहायला मिळेल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.