टेक्स्टाईल इंजिनिअर ते असिस्टंट मॅनेजर : खर्ड्याच्या शिवतेज थोरातची आंतरराष्ट्रीय कापड निर्मिती कंपनीत उच्चपदी वर्णी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जॉर्डन देशात टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या शिवतेज संतोष थोरात या हरहुन्नरी तरूणाने कठोर मेहनत, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक पातळीवर आपल्या कामाची छाप सोडली आहे. त्याने कपड्यांच्या जागतिक उद्योगात मोठं नाव असलेल्या इपिक कंपनीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे कंपनीने त्याच्या खांद्यावर भारतातील कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरपदाची धुरा सोपवली आहे. त्याने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवतेज थोरात हा जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी आहे. तो खर्डा येथील धडाडीचे पत्रकार संतोष थोरात यांचा चिरंजीव आहे. शिवतेज हा टेक्स्टाईल इंजिनिअर आहे. सध्या तो जॉर्डन देशात टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. कपड्यांच्या जागतिक उद्योगात मोठं नाव असलेल्या इपिक कंपनीत त्यांनी मेहनत, शिस्त, गुणवत्तापूर्ण कामगिरी व चाणाक्ष व्यवस्थापन कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या खांद्यावर भारतातील भुवनेश्वर (ओडिशा) येथील कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरपदी धुरा सोपवली आहे.
शिवतेज याचे पायाभूत शिक्षण खर्डा येथील श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयात झाले. बारावीनंतर त्यांनी इचलकरंजी येथील डी. के. टी. ई. टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याची परदेशात काम करण्यासाठी निवड झाली. त्यानंतरच्या काही वर्षांतच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच बळावर त्याची इपिक कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरपदी निवड झाली आहे.
ही बातमी समजताच थोरात कुटुंब, नातेवाईक व संपूर्ण खर्डा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवतेजवर विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव केला. खर्डा प्रेस क्लबतर्फे शिवतेजचा सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील साध्या पार्श्वभूमीतून आलेला तरूण परदेशात जाऊन मेहनत, प्रामाणिकपणा आणि ज्ञानाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर पोहोचतो ही बाब निश्चितच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. शिवतेज थोरात याचे यश हे ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणा देणारे उदाहरण आहे. चिकाटी, मेहनत आणि योग्य दिशा मिळाल्यास यश नक्कीच मिळते हे त्याने सिद्ध केले आहे. त्याच्या याच यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.