जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धानोरा येथील एका ३० वर्षीय तरूणाचा ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने बळी घेतला आहे. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ३१ जानेवासी रोजी सायंकाळी ५ वाजता जामखेड कर्जत रोडवर घडली. ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

जामखेड तालुक्यातील धानोरा येथील अविनाश विक्रम आढाव तरूण मोटारसायकलने कर्जत रोडने जात होता. त्यावेळी डबल ट्राॅलीच्या ऊसाच्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने मोटारसायकलची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, सदर तरूण ट्राॅलीला अडकल्याने १०० फुट फरफटत गेल्याने त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला होता. पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
स्थानिक नागरिकांनी जखमी अविनाशला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतू दुर्दैवाने उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रिफलेक्टर व टेललॅम्प न बसवता ऊस वाहतुक सर्रास सुरु आहे. ऊस वाहतुक करणारे भरधाव वाहने चालवतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहे. या प्रश्नी प्रशासनाने तातडीने कारवाई हाती घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.