जामखेड : कवी हरिश हातवटे यांच्या कवितांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध; कुसुमाग्रज वाचन अभियाना अंतर्गत पिंपरखेडमध्ये गुणवंतांचा गौरव !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “पुस्तके केवळ छापील कागद नसून ते विचारांचे जिवंत झरे आहेत. जो विद्यार्थी अवांतर वाचन करतो, तोच भविष्यात प्रगल्भ विचारांचा नागरिक बनतो,” असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक आणि प्रसिद्ध कवी हरिश हातवटे यांनी केले.

Students mesmerized by poet Harish Hatawate's poems, Talented students honored in Pimperkhed under Kusumagraj Reading Campaign,

मराठी राजभाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पिंपरखेडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ अंतर्गत ‘उत्कृष्ट वाचक विद्यार्थी सन्मान’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हातवटे सरांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विद्यार्थ्यांना वाचनाच्या आणि स्वप्नांच्या दुनियेची सफर घडवून आणली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विक्रम बडे हे होते. जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या संघांना रोख रक्कम स्वरूपात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याचे प्रायोजकत्व जामखेडच्या ‘वैशाली ज्वेलर्सने’ स्वीकारले होते. अमोल चिंतामणी यांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी (गौरवचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रविण शिंदे यांनी कुसुमाग्रज वाचन अभियानाचे’ शैक्षणिक मूल्य विशद केले. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास, शब्दसंग्रह आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी अवांतर वाचन कसे अनिवार्य आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक लबडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत आधुरे दत्ता आधुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सरोदे यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार सुशीला जरे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी केशव हराळे, अंगद कोथमिरे, रवींद्र मधुरकर, भानुदास फुलमाळी, छाया जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.