जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ग्रामीण भागात जीवघेण्या अंमली पदार्थांचे जाळे पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जामखेड शहरातून प्रतिबंधित ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जामखेड पोलिसांसह शनिवारी जामखेड शहरात केलेल्या संयुक्त कारवाईत ड्रग्ज विक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जामखेडमध्ये विषारी ड्रग्जचे अस्तित्व उघड झाल्याने जामखेड तालुका हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरात प्रतिबंधित ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी 14 रोजी छापेमारी केली. या कारवाईत सहा ग्रॅम वजनाचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.
जामखेडच्या कान्होपात्रा नगर येथील मंगेश हिरामन पवार हा 30 वर्षाय युवक ड्रग्ज विक्रीसाठी जात होता.जामखेड कर्जत रोडवरील एका फर्निचरच्या दुकानासमोरुन पोलिसांनी त्याची मोटारसायकल (एम. एच 16, डी. ई 1713) आडवली व त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ 6.17 मिली ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन नावाचा अमली पदार्थ (ड्रग्ज) आढळून आला.
पांढऱ्या रंगाच्या छोट्या प्लास्टिक पाऊच मध्ये असलेले 1 लाख 23 हजार 400 रुपये किमतीचे ड्रग्ज पोलिसांनी या कारवाईत जप्त केले. तसेच 1 लाख रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईत एकुण 2 लाख 23 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हे.कॉ. हृदय गौतम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून जामखेड येथील मंगेश हिरामण पवार व करमाळा येथील मकसुद बागवान या दोघांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग राहुल द्वारके, गणेश लबडे, संतोष खैरे, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालकर, चालक अरुण मोरे, महादेव मिसाळ यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.
जामखेडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे हाय-प्रोफाईल ड्रग्ज सापडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. शहरात ड्रग्जचे रॅकेट सक्रिय आहे का? आणि यामध्ये तरुण पिढीला लक्ष्य केले जात आहे का? या रॅकेटमध्ये बड्या माश्यांचा सहभाग आहे का? जामखेडमध्ये किती दिवसांपासून या ड्रग्जची विक्री सुरू होती? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांना हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेऊन ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे मुळासकट उखडून फेकावे लागणार आहे. यात जर कुचराई झाली तर जामखेड शहर मोठ्या संकटात सापडू शकते, या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.