धक्कादायक: विषारी ड्रग्जचे लोण जामखेडमध्ये, १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जीवघेण्या अंमली पदार्थांचे जाळे पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात जामखेड शहरातून प्रतिबंधित ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शनिवारी (१४ रोजी) केलेल्या कारवाईत १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे. जामखेडमध्ये विषारी ड्रग्जचे अस्तित्व उघड झाल्याने जामखेड तालुका हादरून गेला आहे.

Shocking, 10 grams of MD drugs seized in jamkhed, local crime branch takes action, jamkhed crime news today,

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरात प्रतिबंधित ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी छापेमारी केली. या कारवाईत १० ग्रॅम वजनाचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा जामखेड पोलिस सखोल तपास करत आहेत. लवकरच आरोपीच्या नावाचा उलगडा होईल, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

जामखेडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे हाय-प्रोफाईल ड्रग्ज सापडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. शहरात ड्रग्जचे रॅकेट सक्रिय आहे का? आणि यामध्ये तरुण पिढीला लक्ष्य केले जात आहे का? या रॅकेटमध्ये बड्या माश्यांचा सहभाग आहे का? जामखेडमध्ये किती दिवसांपासून या ड्रग्जची विक्री सुरू होती? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांना हे प्रकरण, अत्यंत गंभीरपणे घ्यावे लागणार आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकाव्या लागणार आहेत. ड्रग्ज रॅकटचे पाळेमुळे मुळासकट उखडून फेकावे लागणार आहे. यात जर कुचराई झाली तर जामखेड शहर मोठ्या संकटात सापडू शकते, या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.