खळबळजनक : बनावट दुध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, एलसीबीच्या छापेमारीत केमिकल व इतर साहित्याचा साठा जप्त, जामखेडच्या फक्राबाद येथील घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील फक्राबाद करण्यात आलेल्या छापेमारीत दुधभेसळीचा गोरखधंदा उजेडात आला आहे. बनावट दुध बनवणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (१४ रोजी) पर्दाफाश केला. बनावट दुध बनवण्याचे केमिकल व इतर साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Sensational, Fake milk manufacturing racket busted, stock of chemicals and other materials seized in LCB raid, incident in Fakrabad Jamkhed, crime news today,

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे केमिकल व इतर साहित्यांचा वापर करून बनावट दुध तयार केले जात असून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शनिवारी भल्या सकाळी फक्राबादमध्ये छापेमारी केली. या कारवाईतून बनावट दुध तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले.

यावेळी पोलिसांनी बनावट दुध तयार करण्याचे केमिकल व इतर साहित्यांचा मोठा साठा हस्तगत केला आहे.राहुरीतील एका प्रकरणामुळे फक्राबादमध्ये सुरू असलेल्या बनावट दुध तयार करण्याच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. फक्राबादमध्ये हा धंदा किती दिवसांपासून सुरू होता? या धंद्यात जामखेड तालुक्यातील इतर कोण कोण पार्टनर आहेत? बनावट दुध तयार करणारे आणखीन किती बोके जामखेडमध्ये आहेत? या सर्वांचा उलगडा एलसीबीला व स्थानिक पोलिसांना तातडीने करावा लागणार आहे. मानवी आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळणाऱ्या या बोक्यांचा तातडीने बिमोड करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या प्रकरणात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचे सविस्तर तपशील जामखेड टाइम्सच्या हाती अद्याप आलेले नाहीत. सविस्तर माहिती मिळताच पुढील वृत्त प्रकाशित केले जाईल.