Sagar Mohalkar News : १२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; कुख्यात गुंड सागर मोहळकरचा ससूनमध्ये मृत्यू!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहर हादरवणाऱ्या पैलवान सागर मोहळकर (Sagar Mohalkar) गोळीबार प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. ४ मार्च रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर गेल्या १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या सागर मोहळकरचा अखेर सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील ससून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

​४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड सागर मोहळकरवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्याच्या शरीरात पाच गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्यावर जामखेड व अहिल्यानगर येथे उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी तातडीने पुण्याला हलविण्यात आले होते.

पुण्यातील ससून रुग्णालयात गेल्या १२ दिवसांपासून उपचार सुरू होते. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मोहळकरच्या मणक्यात अडकलेली गोळी काढली होती. मात्र, गोळ्यांचा गंभीर परिणाम शरीरातील इतर अवयवांवर झाल्याने त्याची प्रकृती सतत खालावत गेली. गेली काही दिवस तो व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होता. अखेर सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

​तपासात उघड झालेलं ‘कोथरूड कनेक्शन’

​या प्रकरणाचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी अभिमन्यू महादेव पोते (रा. जामखेड) याला झिक्री परिसरातून अटक केली होती. त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती.

  • जुन्या वादाचा वचपा: जुन्या वादातूनच सागरचा काटा काढण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.
  • पुणे कनेक्शन: हा हल्ला करण्यासाठी पुण्याच्या कोथरूड भागातील गुंडांची मदत घेण्यात आली होती.
  • ​आरोपींची धरपकड: पोलिसांनी आतापर्यंत अभिमन्यू पोते आणि पुण्यातील रोहित विठ्ठल आखाडे याला अटक केली आहे.
  • फरार आरोपी: चार्ली ऊर्फ माऊली साठे आणि चिन्या या पुण्याच्या सराईत गुंडांचा शोध अद्याप सुरू आहे.

​सागर मोहळकरच्या मृत्यूनंतर जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मोहळकर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी याआधी ‘खुनाचा प्रयत्न’ आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. मात्र, आता सागरचा मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात ‘खुनाचे कलम’ वाढणार आहे.

📢 ताज्या बातम्या मिस करू नका!
👉 जामखेड टाइम्स Channel Follow करा