Rushikesh Vaidya Vasai : ‘मी साक्षात शंकर, तू माझी पार्वती…’ अध्यात्माच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार;वसईचा स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य फरार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Rushikesh Vaidya Vasai : अध्यात्माचे गाढे ज्ञान असल्याचे भासवून आणि स्वतःला महादेवाचा अवतार सांगून एका ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईतील ‘आमची वसई’ या संस्थेचा प्रमुख आणि स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्यावर पुण्यातील हडपसर (मांजरी बुद्रुक) पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार आणि पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Rushikesh vaidya vasai, I am truly Shankar you are my Parvati,Torture of married woman under the pretext of spirituality, Vasai self-proclaimed religious guru Rishikesh Vaidya absconding,

​फेसबुकवरून ओळख आणि जाळ्यात ओढण्याचे तंत्र

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील रहिवासी असून २०२३ मध्ये तिची ओळख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. वैद्य याने महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेतला. तिला ‘अध्यात्म’ शिकवण्याचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर २०२३ मध्ये वैद्य तिला भेटण्यासाठी पुण्यात आला होता.

नशिल्या पदार्थाचा वापर आणि अत्याचार

पुण्यातील मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये त्याने पीडितेला नेले. “मी साक्षात शंकराचा अवतार असून तू माझी पार्वती आहेस. तू तुझे सर्वस्व शंकराला अर्पण केले पाहिजे,” असे म्हणत त्याने तिला भुलवले. त्यानंतर तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यादरम्यान त्याने पीडितेचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले.

​फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंग

​या अश्लील फोटोंच्या आधारे ऋषिकेश वैद्यने पीडितेला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मे २०२५ मध्ये जेव्हा पीडिता वसईत आली होती, तेव्हा तिला ‘हॉटेल एक्सप्रेस इन’ येथे बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिला स्वतःचेही आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवून मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे मिळाला धीर

​नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण गाजल्यानंतर पीडित महिलेने हिंमत एकवटली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी बुधवारी संध्याकाळी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पहिली घटना पुण्यात घडली असल्याने झिरो एफआयआर (Zero FIR) नोंदवून हे प्रकरण पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

​आरोपी फरार, सोशल मीडियावर मात्र सक्रिय

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ऋषिकेश वैद्य फरार झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान, फरार असतानाही त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असून लवकरच सत्य समोर येईल; सत्यमेव जयते.”

  • महत्वाचे मुद्दे:
  • ​अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने फेसबुकवरून ओळख.
  • ​स्वतःला महादेवाचा अवतार सांगून महिलेची फसवणूक.
  • ​अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंगचा प्रकार.
  • ​पुणे आणि वसई पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

​भोंदूगिरी आणि धर्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.