जामखेड नगरपरिषद निवडणूकीत पुन्हा रंगणार राम शिंदे विरूध्द रोहित पवार सामना, निवडणूक तयारीत शिंदेंनी घेतली आघाडी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । गेल्या सात आठ वर्षांपासून रखडलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूकीचा मुहूर्त अखेर निघाला आहे. सोमवारी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. जामखेड नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर यंदा होणारी ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे.या निवडणुकीसाठी इच्छूकांनी जोरदार कंबर कसली आहे. प्रभागात जोरदार गाठीभेटी हाती घेतल्या आहेत. जनसंपर्क करत जनतेत आपली लोकप्रियता वाढवण्याची धडपड सुरु केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

Ram Shinde vs Rohit Pawar match to be played again in Jamkhed Nagar Parishad elections, Shinde takes lead in election preparations, Jamkhed Municipal Council elections 2025,

जामखेड नगरपरिषदेसाठी १२ प्रभाग असणार असुन यातून २४ नगरसेवक निवडले जाणार आहेत, तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. २५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगताना दिसणार आहे. या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूकांनी जोरदार कंबर कसली आहे. विधानसभेनंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणुक असल्यामुळे या निवडणुकीत विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या पदासाठी भाजप व राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार ? याकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. पण शहरावर एकहाती मजबुत पकड असलेले एकही नाव नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नाही, ऐनवेळी आयात उमेदवार राष्ट्रवादी (SP) रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षासह इतर राजकीय पक्षांची दमदार तयारी नाही, तिसरी आघाडी निर्माण करून निवडणुकीत रंग भरण्याचा तोडका प्रयत्न काही पक्षांकडून होऊ शकतो, तर दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी (AP) यांची स्वबळाची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सलग दोन दिवस जामखेड शहरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी निवडणूक संचलन समितीची बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत निवडणुकीतील रणनीती, संघटनात्मक तयारी, तसेच स्थानिक स्तरावर पक्षाच्या विजयासाठी आवश्यक नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत जामखेड नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दुसरीकडे भाजपचा प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीत (SP) कमालीची शांतता आहे. रोहित पवार अद्याप जामखेडला फिरकले नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झालेले दिसत आहेत. तर प्रा राम शिंदे यांनी संचलन समितीची बैठक घेत कार्यकर्त्यांत जोश भरला आहे. त्यांनी या बैठकीतून नगरपरिषद निवडणूकीचे रणशिंग फुंकत आघाडी घेतली आहे. भाजपकडून उमेदवारी देताना प्रा शिंदे हे स्वता: जातीने लक्ष घालणार आहेत. मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून यंदाच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना अनेक गोष्टींची भाजपकडून खबरदारी घेतली जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, शहरातील सर्वच प्रभागात इच्छूकांचा भरणा अधिक आहे. सर्व इच्छूक मोठ्या पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहराच्या विकासाचे व्हिजन नगराध्यक्षपदाच्या एकाही उमेदवाराने अद्याप मांडलेले नाही. शहराच्या प्रश्नांचा विसर या इच्छूकांना पडल्याचे चित्र आहे.