राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईत २६ जुलैची पुनरावृत्ती ? पावसाचा जोर आणखी वाढणार, राज्यात पावसाची स्थिती काय ? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वच भागात आज (१९ ऑगस्ट रोजी) पावसाचा जोर वाढला आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे मुंबईतील सखल भागांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मुंबईत पडत असलेला तुफान पाऊस २६ जुलैच्या महाप्रलयाच्या आठवणी पुन्हा जागवणार असेच दिसत आहे. मुंबईतील अनेक रस्ते वाहतुक बंद करण्यात आले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात दुपारपासून पावसाने जोर धरला आहे. महाराष्ट्रात अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पोळ्यापर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Rain havoc in maharashtra, repeat of July 26 in Mumbai? Rain intensity will increase further, what is rain situation in maharashtra? Know in detail, latest rain update today,

अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस सुरु आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यात मंगळवारी दुपारपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागात संततधार पाऊस सुरु आहे. जामखेड तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खर्डा परिसरातील मोहरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. कर्जत तालुक्यातील सिना धरणातून सोमवारपासून विसर्ग सुरु करण्यात आला असून आज पडत असलेल्या पावसामुळे या विसर्गात वाढ होणार आहे.

मुंबईत पावासाचा जोर वाढलेला असतानाच समुद्राला मोठी भरती आली आहे. मुंबई समुद्रकिनारी जोरदार लाट धडकत आहे. शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून यादमदार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे. निसर्गाचे रौद्ररूप मुंबईत दिसून येत आहे. तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, बीड, विदर्भ, ऊर्वरीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही पावसाची तुफान बॅटींग सुरु झाली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नद्यांना पुर आला आहे. यामुळे  राज्याच्या अनेक भागातील जनजीवन प्रभावित झाले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 12 हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. मागील वर्षी पुण्यात पुरपरिस्थितीमुळे नागरी भागात पाणी घुसले होते. यामुळे मोठे नुकसान झाले होते. खडकवासला धरणाचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुणेकरांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.

बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढली!

गेल्या पाच-सहा दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर भरले असून सध्या दहा हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. आवक याच वेगाने कायम राहिल्यास रविवार पर्यंत धरण ८० टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे बीड आणि माजलगावसह २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.

पालघर तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग पावसामुळे सूर्या, वैतरणा, वांद्री आणि हात नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.महामार्गालगतच्या ढेकाळे आणि हालोली गावात नाल्याच्या पुराचे पाणी घुसल्याने घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सीताड पाड्यातील तीन व हालोलीतील सांबरे पाड्यातील सहा घरांत पाणी शिरल्याने गृहपयोगी साहित्य व सामान भिजून गेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. संगमेश्वरच्या माखजन बाजारपेठेत गडनदीचं कालपासून पाणी घुसल्याने 10 ते 12 दुकानांचं नुकसान झाले आहे. खेडची जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, बावनदी आणि सोनवी, लांजा तालुक्यातील काजळी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 48 धरणं 100 टक्के भरली आहेत.

दुसरीकडे कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. सततच्या पावसामुळे राधानगरी धरणच्या सातही धरणातून पाणी विसर्ग सुरु असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 34.9 फुटावर पोहोचली आहे. कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून तैनात आलेल्या टीमकडून पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी तपासण्याचं काम सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी कितपत आहे याचा जीपीएस ट्रॅकिंग च्या आधारे आढावा घेतला जात आहे. नदी परिसरात बोटीतून तांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने लॅपटॉप मध्ये हा डेटा रेकॉर्ड केला जात आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचे पाहायला मिळते.

भीमा नदीतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग!

उजनी आणि वीर धरणातून पंढरपूरच्या भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग येत आहे. वीर धरणातून 23 हजार क्युसेक तर उजनी धरणातून 6 हजार क्युसेकने पाणी भीमेच्या पात्रात येत आहे. अशा परिस्थितीत भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11:00 वाजलेपासून धरणांमधून भीमा नदीत पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या भीमा खोऱ्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. परिणामी आता भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल.

गेले काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु असल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी काही सखल भागात साचण्यास सुरुवात झाली आहे. जगबुडी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अति मुसळधार पाऊस सुरु आहे.

सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून कोयना नदीपात्रात ५३०० क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

सांगलीत पावसाची जोरदार बॅटिंग

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे.गेल्या 24 तासात 92 मिलीमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे,त्यामुळे चांदोली धरण जवळपास 94 टक्के इतकं भरले आहे. यामुळे चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून 18 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे.34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 32 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण जवळपास भरत आले आहे.तर सकाळपासून धरणातून वारणा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवुन 18 हजार क्यूसेक करण्यात आलाय,यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोयना धरण अपडेट काय

कोयना धरणातून 41हजार 500 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 6 फुटापर्यंत उघडले आहे. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.

वसई-विरार,नालासोपाऱ्यात मुसळधार

वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीपासून पावसाचा कहर सुरु होता. त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं काहींच्या घरात ही पाणी साचलं शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून मार्ग काढताना तारांबळ उडत होती. अनेक वाहने ही बंद पडत होते. हवामान विभागाने आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अरुण गुट्टे यांनी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. थोडीफार बचावलेल्या पिकांना वाचवण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अरुण गुट्टे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच महसूल आणि कृषी विभागाकडून पाहणी करून पंचनामेही केले जात आहेत.

जालन्यात पावसाचे धुमशान

जालना जिल्ह्यामध्ये मागील तीन ते चार दिवसापासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान होताना पाहायला मिळत आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यात देखील काल आणि परवा दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे.बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात पावसामुळे शेताला अक्षरशः तलावाच स्वरूप आल असून खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहे.पाडळी शिवारातील सोयाबीन,मका, कपाशी ही पिके पूर्णता पाण्याखाली गेली असून शेताला तलावाच स्वरूप आलं आहे.

धुळ्यात पावसाचा कहर

धुळे शहरातील तेउराम हायस्कूलमध्ये पावसाचे पाणी साचले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे अद्यापही शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाणी निचरा होत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल झाले. मोठ्या प्रमाणात शाळेच्या मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे उघडले आहेत. सध्या हतनूर धरणातून 63 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. विदर्भात सतत त्याने पावसाचा जोर कायम असल्याने हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हे दरवाजे उघडले आहेत.

नाशिक जिल्ह्याला देखील आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट असले तरी नाशिक मध्ये अद्याप तरी पाऊस नाही. जलसंपदा विभागाचा नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. पावसाचे आगमन झाल्यास गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडण्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. पाणी सोडावे लागल्यास गोदावरीची पातळी अचानक वाढू शकते. येणाऱ्या तीन दिवसात केव्हाही धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. गोदाकाठावरील सर्व गावांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.

बुलडाण्यात पुरामुळे शेती खरडली

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात काल झालेल्या पावसाने जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर आला होता. त्यामुळे नदी काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन तूर उडीद मूग यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामा झाले नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चंद्रपूराला पावसाचा फटका

चंद्रपूर जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार, चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

भामरागडचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटक्यामुळे भामरागड तालुक्याच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. भामरागडच्या मुख्य पुलावरून तीन ते चार फूट पुराचे पाणी वाहत आहेत. रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. छत्तीसगड राज्यातही मुसळधार पावसाचा फटका इंद्रावती नदीला बसला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नदी इंद्रावती व व उपनदी परलाकोटा या दोन नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. भामरागड तालुक्यातील जवळपास 40 गावे जिल्हा मुख्यालयाशी संपर्क च्या बाहेर आहेत. या पावसाळ्यात पाचव्यादा भामराड तालुक्याच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. भामरागड गावाला नदी लागू नसल्यामुळे बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे.तहसीलदारांनी भामरागड मधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

पुण्यात पावसाचा जोर कायम

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कालपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता. धरण साखळीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला, त्यामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली.

सद्यस्थितीत पानशेत धरणातून १ हजार २४२ क्युसेकने, वरसगाव धरणातून १ हजार ८७६ क्युसेकने तर टेमघर धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यास खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण १०० टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून १५०० क्युसेक्स ने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भिमाशंकर परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पवना धरणातून विसर्ग वाढणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 19 ऑगस्ट रोजी आज पवना धरण 99.14% भरलेले असून सध्या नदीपात्रात एकूण 2130 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे 1400 क्युसेक व सांडव्याद्वारे 730 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने आज सकाळी 9 वाजता सांडव्याद्वारे होणारा विसर्ग वाढवून 1460 क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील एकूण विसर्ग 2860 क्युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

धरणातून होणारा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.