कर्जत: रायगड ते सिंहगड… किल्ले बनवा स्पर्धेत शिवकाल जिवंत! चापडगावात ५५ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवजयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील वृक्षवल्ली ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “किल्ले बनवा स्पर्धा – २०२६” या अभिनव व ऐतिहासिक उपक्रमाला विद्यार्थ्यांचा, युवकांचा तसेच पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ५५ स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून शिवकालीन किल्ल्यांच्या आकर्षक, अभ्यासपूर्ण आणि कल्पक प्रतिकृती सादर केल्या. या स्पर्धेच्या माध्यमांतून चापडगावात शिवकाल जिवंत झाल्याचे दिसून आले. शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा जागर यातून झाला.

ही स्पर्धा बाल गट (इ. ७ वी पर्यंत) आणि खुला गट (इ. ८ वी पुढे) अशा दोन विभागांमध्ये स्पर्धा पार पडली. स्पर्धकांनी रायगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, सिंहगड, जंजिरा आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या सुबक प्रतिकृती साकारून शिवकालीन इतिहास जिवंत केला. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, ऐतिहासिक माहितीची अचूकता, सादरीकरण, देखणेपणा व कल्पकता या निकषांवर परीक्षण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण शिवाजी रोडे सर, अॅड. विकास शिंदे व गणेश सोनवणे यांनी केले.

स्पर्धेच्या अंतिम निकालात खुला गटातून रेणुका अतिश शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावत ₹७००० रोख व चषक, स्वराली दादासाहेब सोनवणे हिने द्वितीय क्रमांक पटकावत ₹५००० रोख व चषक, तर काव्या सोमनाथ निंबाळकर हिने तृतीय क्रमांक पटकावत ₹३००० रोख व चषक मिळविला.

बाल गटातून शौर्य गणेश वरडूळे याने प्रथम क्रमांक पटकावत ₹७००० रोख व चषक, दुर्वा अभिजीत पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावत ₹५००० रोख व चषक, तर शिवराज बाळासाहेब शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावत ₹३००० रोख व चषक मिळविला. स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीसाचा मान आदित्य विक्रम निंबाळकर व भाग्यश्री बापुराव बेद्रे यांनी मिळविला.

मुलांचे कौशल्य व सर्जनशीलता वाढावी या उदात्त हेतूने चापडगावचे सुपुत्र सहायक वनसंरक्षक अजित शिंदे, सहायक वनसंरक्षक दत्तात्रय मिसाळ, युवा उद्योजक अतुल शिंदे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. आकाश शिंदे, हॉटेल गारवा फॅमिली रेस्टॉरंटचे प्रकाश घनवट तसेच सदगुरु होलसेलचे अभिजीत शिंदे यांनी विजेत्यांना बक्षिसे दिली.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व विजेत्यांना ट्रॉफी, रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आयोजक व मुख्य समन्वयक अॅड. विकास शिंदे म्हणाले, “चापडगाव व परिसरात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे. मुलांचा उत्साह, कल्पकता आणि इतिहासाविषयीची आवड पाहून आम्हाला अभिमान वाटतो. पुढील वर्षी ही स्पर्धा यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक पारितोषिकांसह आणि व्यापक सहभागासह आयोजित करण्याचा आमचा निश्चय आहे.”

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सौजन्यदाते, परीक्षक, स्वयंसेवक, पालक व ग्रामस्थ यांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.