जामखेड : अभिमानास्पद ! टेंपोचालक बापाच्या कष्टाचं झालं सोनं – लेकरं पोहचली MBBS, BAMS, IISER मध्ये, वंजारवाडीतील मिसाळ कुटुंबाची प्रेरणादायक कहाणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : गरिबी बहुतेकवेळा स्वप्नांना गाडून टाकते. पण अंगी जर जिद्द, चिकाटी, आणि ध्येयासाठी झगडायची तयारी असेल, तर गरिबी स्वप्नांच्या आड येत नाही. हीच गोष्ट जामखेड तालुक्यातील वंजारवाडी गावात अक्षरशः घडली आहे. मर्यादित आर्थिक परिस्थिती असतानाही बाळासाहेब मिसाळ यांनी आपल्या ३ मुलांना उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर पोहचवले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासातून ‘कष्ट, जिद्द आणि शिक्षण’ या त्रिसूत्रीचं जिवंत उदाहरण समोर आले आहे. मिसाळ यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत जो आदर्श घालून दिला, तो केवळ गावापुरता नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

“जमिनी विकून का होईना, पण लेकरं शिकवा” ही संत भगवान बाबांची शिकवण वंजारवाडीच्या बाळासाहेब मिसाळ यांनी अक्षरशः जपली आणि ती सत्यात उतरवली आहे. पिकअप टेंपो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांनी मुलांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले. त्यादृष्टीने त्यांनी संघर्ष सुरू केला. बापाच्या या संघर्षाला मुलांनी लहानपणापासून तोलामोलाची साथ दिली. बघता बघता वंजारवाडीत इतिहास घडला. मिसाळ यांची तीन लेकरं उच्चशिक्षणाच्या वाटेवर आहेत.
बाळासाहेब मिसाळ यांची मोठी मुलगी वैष्णवी BAMS शिक्षण घेत आहे, मुलगा वैभव हा प्रतिष्ठित IISER भोपाळ या गव्हर्नमेंट रिसर्च सेंटरमध्ये शिक्षण घेत असून, धाकटी मुलगी वनश्री हिची नुकतीच जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी निवड झाली आहे. गरीबीत जन्मलेली स्वप्नं जिवंत ठेवणाऱ्या बापाच्या, जिद्दी लेकरांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली भरारी, बापाच्या कष्टांचं सोनं करणारी ठरली आहे.
मिसाळ कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असून, पोटापाण्यासाठी बाळासाहेब दिवस-रात्र पिकअप टेंपो चालवत होते. घरखर्च, मुलांचं शिक्षण, आणि आर्थिक ताण या तिघांमध्ये संतुलन साधणं सोपं नव्हतं. तरीही त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीच तडजोड केली नाही. मुलांचं प्राथमिक शिक्षण खामगाव जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण अरणेश्वर विद्यालय अरणगाव येथे झालं.
कुठलेही खासगी शिकवणी वर्ग नाहीत, मुलांनी स्वतःच्या जिद्दीने हे यश संपादन केले. या यशामागे शिक्षकांचेही मोठे योगदान आहे. खामगाव जिल्हा परिषद शाळेचे रामहरी बांगर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवलेली पायाभरणी, तसेच अरणेश्वर विद्यालय अरणगावच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, हेच या मुलांच्या भविष्यासाठी भक्कम पाया ठरले.
फक्त मिसाळ कुटुंबच नव्हे, तर वंजारवाडी गावानेही शिक्षणात क्रांती घडवून आणली आहे. गेल्या तीन वर्षांत या छोट्याशा गावातून सहा मुली वैद्यकीय शिक्षणासाठी निवडल्या गेल्या आहेत –
- ऐश्वर्या आदिनाथ मिसाळ (BHMS)
- वैष्णवी बाळासाहेब मिसाळ (BAMS)
- प्रतिक्षा आजिनाथ जायभाय (BAMS)
- अदिती आदिनाथ मिसाळ (BAMS)
- स्नेहा संतोष नागवडे (MBBS)
- वनश्री बाळासाहेब मिसाळ (MBBS)
हे आकडे फक्त यशाची गोष्ट सांगत नाहीत, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना शिक्षणाद्वारे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्गही दाखवतात.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, पालकांचा विश्वास आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर लहानश्या खेडेगावातील मुलं-मुली उच्च शिक्षणाच्या शिखरावर पोहोचू शकतात हेच वंजारवाडीतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. ‘शिक्षणाचं स्वप्न, कष्टाची साथ आणि जिद्दीची ताकद असेल तर आभाळही जवळ येतं,’ हा प्रेरणादायी संदेश देणार्या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांचे पालकांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !