जामखेड: हळगाव कृषि महाविद्यालयास पाणी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास तत्वता: मान्यता, राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्यात आली. जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे)राधाकृष्ण विखे-पाटील व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय आज 10 रोजी घेण्यात आला.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे 60 विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाची दिनांक 23-01-2018 रोजीच्या शासन निर्णय क्र.मफुकृवि- 1415/प्र.क्र.228/7-अे अन्वये स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयाकडे हाळगाव येथील गट क्रमांक 16 मधील एकूण 40 हेक्टर 48 आर इतकी जमीन आहे. सदरहू कृषी महाविद्यालय हे अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत असून येथील वार्षिक पर्जन्यमान 550 मिमी पेक्षा कमी आहे. त्यामुळे महाविद्यालयाला पिण्याच्या पाण्यासाठी तसेच बिजोत्पादन कार्यक्रम, पिक प्रात्याक्षिके यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. त्या अनुषंगाने नागपूर हिवाळी अधिवेशन काळात आज उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत सर्वांनुमते हळगावपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून हळगकव कृषी महाविद्यालयाकरिता पिण्यासाठी 0.0136 द.ल.घ.मी. व प्रक्षेत्र सिंचनासाठी 0.41 द.ल.घ.मी. इतक्या पाणी उचलण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच सदर महाविद्यालयाचे इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिकता देण्याबाबत निर्देश देण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्य अभियंता जलसंपदा संजीव चोपडे,  अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता, जलसंपदा प्रवीण घोरपडे, कृषी विभागाच्या उप सचिव प्रतिभा पाटील, रोशन हरवार (उपसचिव, मंत्रालय), सु. स. खांडेकर (अधीक्षक अभियंता) डॉ. दत्तात्रय सोनवणे (प्राचार्य, पु.अ.हो.शा.कृ.म.वि., हळगाव) मिलिंद ढोके (विद्यापीठ अभियंता, म.फु.कृ.वि.) यांच्यासह कृषी व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.