धक्कादायक: पिक अपच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, कर्जत तालुक्यातील राशिन येथील घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत (karjat) पोलिस दलासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद ठरला. राशीन (rashin) येथे रात्र गस्तीच्या वेळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत असताना पोलीस काँस्टेबल सुदाम पोकळे (Sudam Pokale Police) यांचा भीषण अपघातात (accident news) दुर्दैवी मृत्यू झाला. भल्या पहाटे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्जत पोलिस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले पोलिस काँस्टेबल सुदाम राजू पोकळे वय ३०, हे राशिन येथील महात्मा फुले चौकातील करमाळा रस्त्यावर रात्र गस्तीच्या वेळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत असताना त्यांना पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. सदर अपघातात काँस्टेबल पोकळे हे गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १९ डिसेंबर रोजी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास घडली.


मयत पोकळे हे आष्टी तालुक्यातील चिंचाळा देसुर येथील रहिवासी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कर्जत व आष्टी तालुक्यासह पोलिस दलात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.