Chingya More Dhind : जामखेडमध्ये पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कारवाई; कुख्यात चिंग्या मोरेची भरचौकात धिंड, गुंडांनो आता सुट्टी नाही- पोलिसांचा खणखणीत इशारा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.कुख्यात सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ ‘चिंग्या’ मोरे (Chingya More Jamkhed) याची भरचौकातून धिंड (Dhind) काढत गुंडांनो सावधान, आता सुट्टी नाही, असाच खणखणीत इशारा दिलाय.पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामखेडमधील सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ चिंग्या मोरे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यांसारखे तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणात तो फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ८ मार्च रोजी त्याला जेरबंद केले होते. त्यानंतर ९ मार्च रोजी जामखेड पोलिसांनी चिंग्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या टीमने कुख्यात गुन्हेगार अक्षय उर्फ चिंग्या मोरे याची शहरातील प्रमुख रस्त्यांवरून धिंड काढली. पोलीस बंदोबस्तात पायी फिरवत त्याचा माज उतरवण्यात आला. या हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे.
पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव, उपनिरीक्षक किशोर गावडे, जितेंद्र सरोदे, आकाश शेवाळे, गणेश भागडे, गणेश काळाणे, कुलदीप घोळवे, यांच्या पथकाने कुख्यात गुंड चिंग्या मोरेची शहरातून धिंड काढली. खाकीची दहशत आणि दरारा काय असतो हेच आता या कारवाईतून जामखेड पोलिसांनी दाखवून दिले आहे.
जामखेडमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आक्रमक मोहीम सुरू केली असून गुंडगिरी करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. “जामखेडमध्ये गुंडगिरी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही,” असा जणू खणखणीत इशाराच जामखेड पोलिसांनी दिला आहे.
कोण आहे चिंग्या मोरे ?
अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा मुळचा पाटोदा ता. जामखेड येथील रहिवासी आहे. मात्र, तो जामखेडमध्ये वास्तव्यास आहे. एका बड्या गँगचा सदस्य असलेल्या चिंग्यावर खुन. खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी सह आदी १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी जामखेडमधील एका हाॅटेलवर त्याच्या टोळीने धुडगूस घालत गोळीबार केला होता. त्या प्रकरणापासून तो फरार होतो. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची शहरातून धिंड काढली.