पोलिस भरती २०२४-२५  : राज्य सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलीस दलात होणार १५ हजार पोलिस शिपाई पदभरती, लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्य पोलिस दलात पोलिस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो तरूणांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत.

Police Constable Recruitment 2024-25, Big decision of maharashtra government, 15 thousand police posts will be recruited in Maharashtra Police Force, OMR system will be used for the written examination, police bharati 2025-26

या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे

पोलीस शिपाई भरती २०२४-२५ : खालील पदांसाठी होणार भरती

  • पोलीस शिपाई – १० हजार ९०८,
  • पोलीस शिपाई चालक – २३४,
  • बॅण्डस् मॅन – २५,
  • सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३,
  • कारागृह शिपाई – ५५४

पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.

भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.