आदेश आले रे .. राज्यातील 32 जिल्ह्यांमधील जिरायती व बागायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध उठले !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर सह राज्यातील 32 जिल्ह्यांमधील जिरायती व बागायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. आता २० गुंठे (अर्धा एकर) जिरायती व १० गुंठे बागायती जमिनीची खरेदी-विक्री थेट करता येणार आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

orders have come, Restrictions on purchase and sale of arable and horticultural land in 32 districts of state have been lifted,

नवीन शासन आदेशानुसार २० गुंठे (अर्धा एकर) जिरायती व १० गुंठे बागायती क्षेत्राच्या खरेदी-विक्रीसाठी कोणाच्याही स्वतंत्र परवानगीची गरज नाही. पण, त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्रीसाठी प्रातांधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

राज्यातील अकोला व रागयड हे दोन जिल्हे वगळून अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक,धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, लातूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसह अन्य कोणत्याही खासगी व्यक्तीला १० गुंठे बागायती व २० गुंठे जिरायती जमिनीची खरेदी-विक्री थेटपणे करता येणार आहे.

पण, हा नवा बदल महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका क्षेत्र वगळून लागू असणार आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दुय्यम निबंधकांना पत्र काढून नवीन बदलानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अव्वर सचिव सुभाष राठोड यांनी नवी मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर या विभागीय आयुक्तांसह जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना या बदलानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडल्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतत अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार प्रमाणपभूत क्षेत्रात अशंत: सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता २० गुंठे जिरायती व १० गुंठे बगायती जमिनीची खरेदी-विक्री थेटपणे करता येणार आहे. त्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

घरकूल, विहीर व शेत रस्त्यांसाठी निर्बंध शिथिल

बेघरांना गावात स्वत:ची जागा नाही, पण त्यांना शेतात घर बांधण्यासाठी अडचणी येत आहेत. तर जमिनी असलेल्या अनेकांच्या नातेवाईकांनाही तो प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे अशा लोकांना ५०० चौरस फूट जागेची खरेदी-विक्री करता येणार आहे. दुसरीकडे शेती आहे, पण विहिरीसाठी दुसरीकडे जागा पाहिजे, अशा शेतकऱ्यांसमोरही अडचणीचा डोंगर उभा आहे. त्यांना दोन गुंठे आणि शेत आहे, पण रस्ता नाही अशा शेतकऱ्यांसाठी देखील रस्त्यासाठी काही प्रमाणात जमीन खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याची कार्यवाही साधारणत: १५ सप्टेंबरनंतर सुरु होईल, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

जामखेडमध्ये नव्या आदेशानुसार खरेदी विक्री सुरू

जामखेड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहार बंद होते. मात्र आता सरकारने जारी केलेल्या नव्या अधिसुचनेनुसार २० गुंठे जिरायती व १० गुंठे बागायती जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार जामखेडमध्ये सुरु झाले आहेत.