वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त हाळगाव कृषी महाविद्यालयात भव्य सामूहिक गायन,देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव येथे सामूहिक गायनाचा भव्य उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रेरणा भोसले यांनी भूषविले.

प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. प्राची विनोद शिंदे हिने आपल्या मनोगतातून ‘वंदे मातरम’ गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय आंदोलनातील योगदान आणि देशभक्ती जागविण्यातील महत्त्व यावर प्रभावी भाष्य केले. तिने प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना जपावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार यांनी सादर केले. सामूहिक गायनाद्वारे ‘वंदे मातरम’ गीताचे स्वर संपूर्ण परिसरात गुंजले आणि वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेम दृढ करण्याचा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु. प्रिती अंबादास कवळे हिने केले, तर आभार प्रा. पोपट पवार यांनी मानले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहवर्धक स्वरूप लाभले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि “भारत माता की जय” या घोषणांनी करण्यात आली.