अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे; 19 हजार 142 कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी, सूरत–चेन्नई हाय-स्पीड कॉरिडॉरला बळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सूरत–चेन्नई हाय-स्पीड कॉरिडॉरचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या नाशिक–सोलापूर (अक्कलकोट) या 6 पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.19 हजार 142 कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प येत्या दोन वर्षांत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून हा प्रकल्प जाणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम भारत थेट दक्षिण भारताशी वेगाने जोडला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. (nashik solapur akkalkot corridor)

देशाच्या पायाभूत विकासाला गती देणारा महत्त्वकांक्षी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने नाशिक–सोलापूर (अक्कलकोट) 6 पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली असून हा प्रकल्प 374 किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी ₹19,142 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक मूल्याचा BOT (Build–Operate–Transfer) प्रकल्प ठरणार आहे.
या नव्या ग्रीनफिल्ड महामार्गामुळे नाशिक–सोलापूरमधील अंतरात सुमारे 14 टक्के घट होणार आहे. सध्या 432 किमी असलेले अंतर कमी होऊन ते 374 किमी राहणार आहे. यामुळे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गावर सरासरी वेग 60 किमी प्रतितासावरून थेट 100 किमी प्रतितास होणार असल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच, सूरत–चेन्नई दरम्यानचा प्रवास वेळ तब्बल 45 टक्क्यांनी कमी होऊन सध्याच्या 31 तासांऐवजी फक्त 17 तासांत हा प्रवास पूर्ण होऊ शकणार आहे.

हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर आदी भागांना मोठा लाभ देणार असून, औद्योगिक विकास, व्यापार, शेतीमाल वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. विशेषतः निर्यातक्षम उद्योग, दळणवळण आणि रोजगारनिर्मितीसाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
सूरत–चेन्नई हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यांमधील दळणवळण अधिक मजबूत होणार आहे. याचा थेट परिणाम व्यापारवृद्धी, गुंतवणूक वाढ आणि आर्थिक विकासावर दिसून येणार आहे.
एकूणच, नाशिक–सोलापूर (अक्कलकोट) 6 लेन ग्रीनफिल्ड महामार्ग हा केवळ रस्ता नसून, वेगवान भारताच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे.वेगवान प्रवास, मजबूत कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला नवी चालना मिळणार असून हा प्रकल्प महाराष्ट्रासह देशाच्या औद्योगिक, व्यापारी व लॉजिस्टिक क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
वेग : 60 ➝ 100 किमी/ता
45% वेळेची बचत