नान्नज प्रकरण तापले : जामखेड कडकडीत बंद, फरार आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार – दिपक केदार यांचा इशारा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील साळवे कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जामखेड बंद अंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी दिवसभर जामखेड शहर कडकडीत बंद होते.बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. दिवसभर सर्व व्यवहार ठप्प होते.

नान्नज प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी रविवारी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जामखेड येथील खर्डा चौक परिसरात रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. रास्तो अंदोलन व निषेध मोर्चासाठी जामखेड व आसपासच्या तालुक्यातील रिपाई, दलित पँथर तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी सर्वांनीच आपल्या आक्रमक भावना यावेळी व्यक्त केल्या. नान्नज घटनेचा तीव्र निषेध नोंदवत सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची जोरदार मागणी यावेळी सर्वांनीच केली.

“आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर झालेला प्राणघातक हल्ला हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. हा साळवे कुटुंबावरील हल्ला नसून, तो समस्त आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांवरील हल्ला आहे. नान्नज प्रकरणातील हल्लेखोरांना बारा तासाच्या आत अटक करावी, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी कोंबिंग आँपरेशन राबवावे, अशी मागणी करत जर आरोपींना तातडीने अटक न केल्यास राज्यात तीव्र अंदोलन छेडण्यात येईल तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा गर्भित इशारा यावेळी आंबेडकरवादी नेते दिपक केदार यांनी दिला.”

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काही गावगुंडानी दि २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यासंबंधी जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडून १५ दिवस उलटले तरी घटनेतील १४ पैकी ८ आरोपी फरार आहेत. या प्रकरणात ६ आरोपी अटकेत आहेत.

सदर प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच पिडीत साळवे कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी करत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने रविवार जामखेड बंदचे अंदोलन छेडण्यात आले होते. रास्ता रोको अंदोलन होण्यापूर्वी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने सकाळी जामखेड शहरातुन निषेध फेरी काढण्यात आली होती. यावेळी समस्त आंबेडकरी समाजाचे नेते कार्यकर्ते, विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको अंदोलनानंतर अंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना सोपवले.