Nanded Paus News : नांदेड जिल्ह्यात निसर्ग कोपला, लोहा कंधारमध्ये अतिवृष्टीने उडवला हाहाकार, पुरात अडकले १५०० नागरिक, बचाव कार्य सुरु
Nanded Paus News : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. 93 मंडळापैकी 69 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पुर परिस्थिती निर्माण घाली आहे. गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या नद्यांना आलेल्या पुरामध्ये 1500 नागरिक अडकले आहेत.

नांदेड जिल्ह्यात एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा कंधार व माळाकोळी या दोन मंडळात सुमारे 284.50 मि.मि. इतका पाऊस झाला आहे. 13 तालुक्यात 65 मिमी तर 11 तालुक्यात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पुरामध्ये 1500 नागरिक अडकले आहेत. तेलंगणात सुद्धा मुसळधार पाऊस सुरु असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर, पोचमपाड या धरणातील बॅक वॉटर व विसर्गामुळे बिलोली, देगलुर, धर्माबाद, मुखेड तालुक्यात पुरस्थिती झाली आहे. येथील 5000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. SDRF, CRPF, स्थानिक पोलिस व प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लष्कराची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात ढगफुटी आणि अतिवृष्टी मुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. ढगफुटी व अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने काहींच्या घरात पाणी शिरले आहे पर या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ, सीआरपीएफ, नांदेड मनपा व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून शोध व बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु आहे.
पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्व यंत्रणासोबत संपर्क व समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अति आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नांदेड येथील पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालीयनला बोलाविले आहे. तात्पुरते स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत असून, कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद कंधार मंडळ व माळाकोळी मंडळ (लोहा) मध्ये प्रत्येकी 284.50 मि.मि. नोंदविली आहे.
तालुकानिहाय अतिवृष्टी झालेली मंडळे- नांदेड 07, बिलोली-06,मुखेड-08, कंधार -07, लोहा-06, हदगांव-05, भोकर-04, देगलूर-05, किनवट-01, मुदखेड-03, हिमायतनगर-01, धर्माबाद-04, उमरी-04, अर्धापूर-03, नायगांव-05 मंडळात अतिवृष्टी नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्याच्या पर्जन्यमान हे 65.00 मि.मि. पेक्षा जास्त असून, त्यापैकी 11 तालुक्याचे पर्जन्यमान हे 100.00 मि.मि. पेक्षा जास्त आहे.
जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तेलंगाना राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर, पोचमपाड या धरणातील बॅक वॉटर व विसर्गामुळे बिलोली, देगलूर, धर्माबाद व मुखेड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत एकूण 5 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एसडीआरएफ, सीआरपीएफ, स्थानिक पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपत्तीग्रस्त लोकांना हलविण्यात आले आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील 3 तलाव फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यत एकूण 3 व्यक्ती नैसर्गिक आपत्तीकारणाने मयत असून 01 व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध चालू आहे. यामध्ये नायगाव तालुक्यातील 1 इसम, उमरी तालुक्यातील रेल्वे विभागातील कार्यरत 1 रेल्वे स्टेशन अधिक्षक यांचा मृत्यू, किनवट तालुक्यात विज पडून 1 व्यक्तीचा मृत्यू तर किनवट येथील एक व्यक्ती बेपत्ता आहे.
नांदेड जिल्ह्याला प्रभावीत करणारे धरण, लघु, मध्यम प्रकल्प, बॅरीकेज स्थिती
- उर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापूर टक्केवारी, 5 दरवाजे उघडले असून विसर्ग 8 हजार 313 क्युसेस आहे.
- येलदरी धरण ता. जिंतूर जि. हिंगोली-येलदरी धरणाच्या उर्ध्व बाजुने आवक कमी झाली असल्याने आज सकाळी 7 वाजता येलदरी धरणाचे गेट क्र. 5 व 6 बंद करण्यात आले आहेत. गेट क्र.01 व 10 हे 0.5 मी. ने चालू असून 4 हजार 219.94 क्युसेस (119.496 क्युमेकस) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात चालू आहे. स्पीलवे गेटमुळे पुर्णा नदीपात्रात स्पीलवे गेट-4 हजार 220 +हायड्रोपावर 2 हजार 700 क्युसेस असा एकूण 6 हजार 920 क्युसेस (196 क्युमेकस) विसर्ग सुरू आहे.
- सिध्देश्वर धरण ता. औंढा जि. हिंगोली- 343.792 क्युमेकस /12141 क्युसेस.
- शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प- 10 दरवाजे उघडले असून विसर्ग 119,008 क्युसेस .
- बळेगाव उच्च पातळी बंधारा ता. उमरी जि. नांदेड- सर्व 16 दरवाजे उघडले असून विसर्ग 5 हजार 97 क्युमेक्स आहे. बंधाऱ्याच्या उर्ध्व बाजूच्या विष्णुपूरी प्रकल्पातून 2 हजार 880 क्युसेस विसर्ग सुरु. सद्यस्थितीत बंधाऱ्याची पातळी 345 मी (FRL-342m) इतकी असून पाण्याची आवक पाहता अजून वाढण्याची शक्यता आहे.
- निजामसागर प्रकल्प- या प्रकल्पाचे 23 गेट उघडले असून एकूण ओव्हर फ्लो 1,67,541 क्युसेस आहे.
- अपर मानार प्रोजेक्ट, लिंबोटी- सकाळी 5.30 वाजता 12 दरवाजे 1.5 m व 3 दरवाजे 2 m ने चालु केले असून 2065 क्युमेकस (72275क्युसेस) विसर्ग सुरु आहे.
अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.