नागपूर हिवाळी अधिवेशनाचा परिणाम : प्रा. राम शिंदेंचे आदेश अन् सहकार संघर्षाला यश; पुण्यश्लोक सोसायटीचे जिल्हा बँकेत खाते उघडले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : नागपूर येथे झालेल्या २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या लक्षवेधीचा थेट आणि ठोस परिणाम नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दिसून आला आहे. पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सुरू असलेला ‘सहकार संघर्ष’ यशस्वी झाला. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि सहकार मंत्र्यांच्या आदेशानुसार २ जानेवारी २०२६ रोजी पुण्यश्लोक सोसायटीचे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकृत बँक खाते उघडण्यात आले असून, त्यामुळे संस्थेच्या नोंदणी प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या आडमुठ्या व मनमानी कारभाराला चांगलीच चपराक बसली आहे.

पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला जिल्हा बँकेत खाते उघडण्याची परवानगी मिळावी यासाठी संस्थेच्या मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडूरंग उबाळे व त्यांचे सहकारी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी विविध शासकीय कार्यालयात आणि बँकेत अनेकदा हेलपाटे मारले परंतू त्यांना यश मिळत नव्हते. सदर प्रकरणी न्याय मिळावा यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठात मागील वर्षी याचिका दाखल केली. त्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यातच सोसायटीचे बँक खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नगर जिल्हा बँकेच्या आडमुठ्या कारभाराचे पडसाद २०२५ च्या नागपुर हिवाळी अधिवेशनात उमटले.
विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर व श्रीकांत भारतीय यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडत नगर जिल्हा बँकेच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले.सदर प्रकरणी सरकारने तातडीने आपली भूमिका जाहीर करावी असे आदेश विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी त्यावेळी दिले होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लक्षवेधीला उत्तर देताना जिल्हा बँकेला सदर संस्थेचे खाते उघडण्याचे व कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले होते.
हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या लक्षवेधीचे सकारात्मक परिणाम नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दिसून आले आहे. पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा गेल्या अनेक वर्षांचा महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागला आहे. २ जानेवारी २०२६ रोजी संस्थेचे नगर जिल्हा बँकेत खाते उघडण्यात आले आहे. यामुळे संस्था नोंदणीचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडूरंग उबाळे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशा पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे बँक खाते उघडल्यामुळे एका नव्या सभासद संस्थेची अधिकृत नोंद झाली असून, त्यामुळे मतदारसंख्येत एका मताची भर पडली आहे.
पुण्यश्लोक सोसायटीचा आठ ते नऊ वर्षांपासून रखडलेला प्रश्न विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या आदेशाने निकाली निघाल्यामुळे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व संस्थांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर जामखेड तालुक्याच्या सहकाराच्या राजकारणातील समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. या घडामोडीमुळे प्रा. राम शिंदे यांचे पारडे अधिक मजबूत झाल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कट्टर समर्थक असलेल्या पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडूरंग उबाळे यांनी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सुरू असलेला प्रशासकीय व राजकीय संघर्ष अखेर जिंकला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत लक्षवेधी गाजल्यानंतर विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि सरकारच्या आदेशानुसार २ जानेवारी २०२६ रोजी पुण्यश्लोक सोसायटीचे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँक खाते उघडण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली संस्थेची नोंदणी प्रक्रिया पुढे सरकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यश्लोक सोसायटीमुळे जामखेड तालुक्यात आणखीन एका सेवा सोसायटीची भर पडली आहे.
- १७ एप्रिल २०१७ : पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था जामखेड यांच्याकडे सादर.
- २०१७ ते २०२४ : जिल्हा बँकेत खाते उघडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा; मात्र प्रक्रिया रखडलेली.
- २४ फेब्रुवारी २०२२ : जिल्हा बँकेचा ठराव क्र. १५ चा संदर्भ देत खाते उघडण्यास नकार.
- १९ मार्च २०२४ : सहकार आयुक्त, पुणे कार्यालयाकडून संस्थेच्या प्रस्तावास मंजुरी.
- १५ एप्रिल २०२४ : सहायक निबंधक, जामखेड यांचे खाते उघडण्यास परवानगीचे पत्र.
- १० जून २०२४ : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खाते उघडता येणार नाही, असे पत्र.
- २०२४ : विभागीय सहनिबंधक, नाशिक यांच्याकडे तक्रार; जिल्हा बँकेला तातडीने कार्यवाहीचे आदेश.
- औरंगाबाद खंडपीठ : बँकेच्या पिळवणुकीविरोधात न्यायालयात याचिका दाखल.
- २०२५ नागपूर हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत लक्षवेधी; आमदारांनी प्रश्न उपस्थित केले.
- २ जानेवारी २०२६ : पुण्यश्लोक सोसायटीचे अहिल्यानगर जिल्हा बँकेत अधिकृत बँक खाते उघडले.