जामखेड : रेणूका कलाकेंद्र तोडफोड प्रकरणी एलसीबीची मोठी कारवाई, सात जणांना ठोकल्या बेड्या, एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे व कार जप्त !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मोहा येथील रेणुका कलाकेंद्राच्या तोडफोड प्रकरणात अहिल्यानगर एलसीबीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एलसीबीने एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसांसह सात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात एलसीबीने ६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे. अटकेतील बहुतांश आरोपी पाथर्डी तालुक्यातील आहेत.

जामखेडच्या मोहा येथील रेणूका कलाकेंद्रावर मागील आठवड्यात दोनदा तोडफोडीची घटना घडली. पाच दिवसांपुर्वी झालेल्या दुसर्या घटनेत १७ जणांच्या टोळक्याने कलाकेंद्रावर मोठा धुडगूस घालत तुफान राडा घातला होता. यावेळी गुंडांच्या टोळक्याने कलाकेंद्राची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत दहशत निर्माण केली होती. या प्रकरणातील आरोपी सीसीटिव्हीत कैद झाले होते.यापुर्वी चिंग्याच्या टोळीने कलाकेंद्रावर मोठी तोडफोड केली होती. दोन्ही घटनेत या टोळीचा संबंध पुढे आला आहे.
रेणूका कलाकेंद्र तोडफोड प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी एलसीबीच्या पथकाने वेगाने तपास हाती घेतला होता. या तपासाला मोठे यश मिळाले. एलसीबीच्या पथकाने सात जणांच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई पार पाडली आहे. या कारवाईत आरोपींकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि स्कॉडा कंपनीचे वाहन असा एकूण ६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एलसीबीच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील शहनवाज अन्वर खान (वय ३०, रा. तिसगाव) जयसिंग दादापाटील लोंढे (वय २५, रा. आडगाव) अविनाश भास्कर शिंदे (वय २९, रा. तिसगाव) गणेश सचिन शिंदे (वय १८, रा. तिसगाव) ऋषिकेश यौसेफ गरुड (वय १८, रा. तिसगाव) अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम (वय २५, रा. आष्टी, जि. बीड) अश्या सात जणांना अटक करण्यात आली आहे.
यातील अनिकेत कदम हा विना नंबरच्या स्कॉडा कारमध्ये गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणातील ११ आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा वेगाने शोध घेत आहेत.
रेणूका कलाकेंद्र तोडफोड प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ५४८/२०२५ भारतीय दंड विधानातील कलम ३३३, ३२४(४)(५), १८९(२), १९१(२)(३), १९० सह आर्म्स अॅक्ट ४/२५ व फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम १९३२ च्या कलम ७ या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी मुद्देमालासह जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. जामखेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा या घटनेचा वेगाने तपास करत आहेत.
ही धडाकेबाज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस हेड काँस्टेबल सुरेश माळी, दिपक घाटकर, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, पोलिस नाईक श्यामसुंदर जाधव, पोकॉ प्रकाश मांडगे, सागर ससाणे, रोहीत यमुल, भागवान थोरात, सतिष भवर, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मपोकॉ सोनल भागवत व चा. पोहेकॉ अर्जुन बडे आदींचा समावेश होता.